साताऱ्यात मिसळ खाल्यानंतर काहीजण जिल्हाभर पळायला लागले, नरेंद्र पाटलांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shiv-sena-satara

सामना ऑनलाईन । कराड

गेल्या पाच वर्षात काय काय झाले हे सर्वांना माहिती आहे. मोदींनी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीला जिल्हास्तरावरील विकास महत्वाचा असतो. दहा वर्षात कधी कोणत्याही तालुक्याला भेट दिली नाही. असे लोक आम्ही सातारा मिसळ खाल्यानंतर जिल्हाभर पळायला लागले आहेत, असा टोला शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी लगावला आहे.

माझा तालुका हा इतरांपेक्षा जास्त मदत करणार हा माझा विश्वास आहे. युतीचा संकल्प पूर्णत्वास नेण्याचे काम सर्वसामान्य नागरिकांनी करावे, असे आवाहन शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी नवारस्ता येथे बोलताना केले.

सातारा लोकसभेचे शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांची प्रमुख कार्यकर्तेची बैठक पाटण तालुक्यातील नाडे-नवारस्ता येथील कृष्ण लीला मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आमदार शंभूराज देसाई, शिवसेनेचे पुरूषोत्तम जाधव, प्राना फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. प्राची पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, ऍड. डी. पी जाधव, अशोकराव पाटील, भरत साळुंखे, भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कविता कचरे, उपजिल्हाध्यक्षा सौ. आयेशा सय्यद, भाजप तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात पंधरा वर्षाच्या कारकिर्दित खोटी चिल्लरच आली. लोकसभेचा उमेदवार हा पाटण तालुक्यातील आहे. राष्ट्रवादीच्या कारकिर्दिमध्ये राज्यामध्ये सगळे घोटाळेच झालेले आहेत. आमच्यावरती बोलणाऱ्यांनी अगोदर स्वतःकडे पाहिले पाहिजे. युती होऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यामध्ये घातले. ठोस निर्णय घेणारे, खंबीर नेतृत्व असणारे नरेंद्र मोदी यांना निवडून द्या व जिल्ह्यातूनही नरेंद्रच होऊद्या असे आवाहन त्यांनी केले.

आमदार शंभूराज देसाई म्हणाले, पाटण मतदारसंघात जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडायची आहे. तालुक्यातील सुपुत्राला लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. घरचा उमेदवार म्हणून निवडून द्यायचा आहे. युती म्हणुन आपण या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. प्रयत्नांची पराकाष्टा करून आपणास जास्तीत जास्त मतं भेटतील असा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

मेळाव्याला मोठ्या संख्येने भाजप-शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.