रात्र महाविद्यालयाशी करारबद्ध असतानाही पदवी महाविद्यालय सुरू करण्याचा नियमबाह्य करार करण्याचा घाट क्षात्रैक्य मराठा समाज तथा डॉ. शिरोडकर शिक्षण संस्थाचालकांनी घातला आहे. एकाच जागेवर दोन वेगवेगळ्या संस्थांशी महाविद्यालय चालवण्याबाबत करार करणे ही फसवणूक असून शिरोडकर संस्थेचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी युवा सेनेने राज्य सरकारकडे केली आहे.
मुंबई विद्यापीठातील युवा सेना व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले आहे. क्षात्रैक्य मराठा समाज तथा डॉ. शिरोडकर शिक्षण संस्थेच्या नावे बोरिवली पूर्व, राजेंद्र नगर येथील जनरल करीअप्पा पुलाशेजारी 89 क्रमांकाचा भूखंड आहे. त्या जागी सुमन शैक्षणिक संस्थेशी एल. एन. रात्र महाविद्यालय चालवण्यासाठी करार केला गेला. ते रात्र महाविद्यालय सुरू असून तिथे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे असतानाही त्याच जागी मॉडेल शैक्षणिक संस्थेशी मुंबई हाय पदवी महाविद्यालय सुरू करण्याचा करार केला गेला. असा नियमबाह्य करार करणे म्हणजे विद्यापीठच नव्हे, तर राज्य शासनाची फसवणूक केल्यासारखे आहे. याप्रकरणी चौकशी करून संस्थेचे अध्यक्ष प्रसाद लाड आणि अन्य पदाधिकाऱयांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी युवा सेनेने या निवेदनात केली आहे.


























































