
‘‘आम्ही खोक्याला हात लावला नाही,’ असे 40 गद्दार आमदार आणि 13 खासदारांपैकी एकही जण बोलला नाही. गद्दारांना याचा जाब विचारणाऱयांच्या मागे मात्र पोलीस आणि तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो. त्यांच्या घरांवर धाड पडते,’’ असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांना मिंधे सरकारवर केला. ‘‘घटनाबाह्य मिंधे सरकार देशासाठी घातक ठरणारे आहे. महिला आमदाराला शिवीगाळ, गद्दार आमदार पोलिसावर गोळीबार करतो. मात्र, काही कारवाई होत नाही. सत्याची बाजू मांडणाऱया पत्रकाराचाही गळा दाबला जातोय. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि संविधानाचा अपमान करून आलेले, लोकशाहीचा खून करणारे हे सरकार आपल्याला नकोय,’’ असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतर घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा वाल्हेकरवाडीतील शुभम गार्डन येथे झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडली.
‘‘भाजपच्या महाशक्तीविरोधात लढा देताना आपल्यासोबत जनशक्ती आहे. लोकांच्या एकजुटीची वज्रमूठ आपल्याबरोबर आहे. या ताकदीच्या जोरावर महाविकास आघाडी विजयी होईल,’’ असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
‘‘राज्यात आणि देशात गद्दारी कोणालाच पटलेली नाही. लोकांमध्ये प्रचंड रोष आणि चीड आहे. याआधी अनेकांनी त्यांची राजकीय विचारसरणी बदलली, पक्ष बदलले. मात्र, त्यांनी आपल्या आमदारकी पिंवा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतरच ते दुसऱया पक्षात जाऊन निवडणुकीला सामोरे गेले. मात्र, आठ महिन्यांपूर्वी राज्यात निर्लज्जपणाचे गलिच्छ राजकारण घडले. असे राजकारण आपण आयुष्यात पाहिले नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. त्यामुळे आजही महाविकास आघाडीच्या सभेला लोकांची गर्दी दिसून येते. कारण लोकांचा, विशेषतः महिलांचा विश्वास महाविकास आघाडीवर आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
‘‘विचारसरणी वेगवेगळी असली, तरी महाराष्ट्राची प्रगती त्यांच्या पोटात दुखत होती. आम्ही केवळ खुर्चीसाठी नाही, तर महाराष्ट्रातील लोकांसाठी एकत्र आलो. गद्दार गँगच्या मागे भाजपची महाशक्ती आहे. महाराष्ट्र पुढे जाऊन प्रगती करीत होता, हेच त्यांच्या पोटात दुखत होते. यासाठीच त्यांनी एका व्यक्तीला पुढे आणले आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीत 40 वार केले आणि सरकार पाडले. मी जेथे जातो, तेथे लोक मला म्हणतात की, ‘आम्हाला महाविकास आघाडीची गरज आहे,’’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
‘‘घटनाबाह्य मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे आहेत की गुजरातचे?’’ असा सवाल करून, ‘‘या गद्दार सरकारला महाराष्ट्राला पुढे न्यायचेच नाही,’’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ‘‘या उद्योजकांचा घटनाबाह्य गद्दार गँगवर विश्वास न राहिल्याने ते बाहेर जात आहेत. हे उद्योग गुजरात व देशात इतरत्र गेल्याचे दुःख नाही, तर राजकीय हेतूसाठी ते तिकडे पाठविले गेल्याचे दुःख आहे,’’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘‘दुसऱया राज्यांबरोबर तुलना करायची आणि महाराष्ट्राला मागे खेचायचे काम मिंधे सरकारकडून सुरू आहे,’’ असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
‘विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, जिल्हाप्रमुख, माजी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार, रिपाइंचे (गवई गट) राजेंद्र गवई, सचिन खरात, संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार, शिवसेना शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेस शहराध्यक्ष पैलास कदम, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.
– आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मिंधे सरकारवर सडकून टीका केली. ‘‘सभेतील गर्दीकडे लक्ष वेधून आमच्या सभेला जनतेची गर्दी असते, तर घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते,’’ असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
राजकीय हेतूसाठी उद्योग पळवले
‘राजीनामे देऊन माझ्या वरळी, मुंबई येथील मतदारसंघातून आपल्याविरुद्ध लढण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांनी न स्वीकारल्याने आता त्यांनी त्यांच्या ठाण्यातील मतदारसंघातून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवावी,’’ असे थेट आव्हानही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. ‘‘माझ्या शरीरात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचे रक्त आहे. गद्दारी करून पाठीत 40 वार करण्यापेक्षा एक वार समोर येऊन कराच! जनता दाखवून देईल, ती कोणाच्या सोबत आहे,’’ असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.




























































