शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख यांनी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांना ही धमकी दिल्याचे देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. राणे यांच्या कुटुंबाविरोधात बोलल्याने मला ही धमकी मिळाल्याचे देशमुख यांनी सांगितले.

”सकाळी साडेअकराच्या सुमारास मला दोन वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन आले. त्यांनी नारायण राणे व नितेश राणे यांचे नाव घेऊ नका असा दम मला भरला व जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही अनेकांना मारून समुद्रात फेकले आहे. त्यांचा थांगपत्ताही लागलेला नाही. तुम्ही मुंबईत आल्यावर तुमचाही चांगलाच समाचार घेऊ, अशी धमकी मला दिली आहे.

नितीन देशमुख यांनी देखील धमकी देणाऱ्याला आव्हान दिले आहे. ”मी मंगळवारी मुंबईत येत असून त्या रात्री आठ ते दहाच्या सुमारास नारायण राणे व नितेश राणे यांना घेऊन नरीमन पॉईंटवर या असे आव्हान त्यांनी धमकी देणाऱ्याला दिले आहे.