छापील शब्दांत क्रांती घडवण्याची ताकद, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी पत्रकारितेला फार मोठी परंपरा आहे. माझा आजही छापील शब्दावर विश्वास आहे. छापील शब्दांत क्रांती करण्याची, सत्ता उलथवण्याची, सत्ता आणण्याची ताकद आहे. माणसं बदलण्याची, माणसांना सुधारण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. प्रदीर्घ पत्रकारितेसाठी ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ विशेष पुरस्काराने संजय राऊत यांना सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

79 वा मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सोहळा आज रंगला. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना वरिष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुरस्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले. इतक्या वर्षांत प्रथमच मी कुठला तरी पुरस्कार घ्यायला आलो. एक तर पुरस्काराची कधी गरज वाटली नाही. ज्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला ‘सामना’चे संपादक केले तोच मला पुरस्कार वाटला. ‘सामना’ हे दैनिक जगात प्रसिद्ध आहे. माझी ओळख त्यामुळे आहे. काही लोक म्हणतात, ‘सामना’ वृत्तपत्र नाही, पण ते चोरून वाचतात. आजचा सन्मान माझा नाही, तर ‘सामना’सारख्या प्रखर दैनिकाचा सन्मान आहे.

चित्रपट क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांना, तर ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि ज्येष्ठ गायिका-संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेते प्रेम चोप्रा यांना चित्रपट क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कवयित्री नीरजा यांना साहित्यातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. डॉ. प्रतीत समदानी, डॉ. जनार्दन निंबोळकर, डॉ. अश्विन मेहता, डॉ. निशित शहा आणि डॉ. समीर जोग यांना समर्पित सेवेबद्दल विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. राजीव शर्मा अनुपस्थित होते. जीवनगौरव पुरस्कार दिग्गज संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना जाहीर झाला होता, मात्र ते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. यावेळी भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर, हृदयेश आर्टचे अविनाश प्रभावळकर, आर्च एंटरप्राइजचे विनीत गोरे उपस्थित होते.

कवितेतून प्रेमाची ज्योत पेटवली – नीरजा

जे कलाकार देश एकाच रंगात रंगवू असे स्वप्न पाहतात, अशी माणसं कलाकार, संवेदनशील पिंवा सर्जनशील असू शकत नाहीत. सर्जनशील माणूस निर्मितीचा विचार मांडत राहतात, विध्वंसाचा नाही. हिंसक काळात कवी लावू पाहतात एका प्रेमाची ज्योत! ही ज्योत लावण्याचा प्रयत्न मी माझ्या कवितेतून करते, असे सत्काराला उत्तर देताना नीरजा म्हणाल्या.

देश इंद्रधनुष्य आहे, त्याचे रंग बदलू नका – नाना पाटेकर

आपला देश हा इंद्रधनुष्य आहे, त्याचे रंग बदलण्याचा प्रयत्न करू नये. या देशातील बाकीचे रंग वगळले तर काहीही उरणार नाही आणि कायम हे रंग असेच राहू दे. आपल्या देशात सर्वच रंगांना वाव आहे, अशा भावना पाटेकर यांनी व्यक्त केल्या. हा पुरस्कार केवळ माझा नाही. या प्रवासात साथ-सोबत केलेल्या प्रत्येकाचा असल्याचे ते म्हणाले.