
बोगस मतदान आणि मतचोरीच्या माध्यमातून मुंबई महापालिका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजप आणि शिंदे गटाच्या कारस्थानाला सोमवारी शिवसेनेच्या भव्य निर्धार मेळाव्याने जोरदार धक्का दिला. ‘हिंमत लढण्याची, मुंबई जिंकण्याची… संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा!!’ असा पक्का निर्धार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बोगस मतदानाद्वारे सत्ता मिळवणाऱ्या ‘महायुती’चे मनसुबे उधळण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वज्रमूठ आवळली.
मुंबईच्या शहर परिसरासह उपनगरांतून शिवसेना विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुख या पदाधिकाऱ्यांच्या गर्दीने वरळी येथील डोम सभागृह खचाखच भरले होते. मेळावा सुरू होण्याची वेळ सायंकाळी पाच वाजताची होती. मात्र दोन तास आधीपासूनच वरळी, हाजीअली परिसर शिवसैनिकांच्या गर्दीने फुलून गेला होता. दादर, वरळी, ताडदेव, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी परिसरात ठिकठिकाणी शिवसैनिक आणि त्यांच्या अंगावरील भगव्या वस्त्राची शान झळकत होती.
डोम सभागृहाचा बाहेरील परिसर पूर्णपणे भगवामय झाला होता. वरळी नाका, महालक्ष्मी, ताडदेव, हाजीअली परिसरात रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले होते. सभागृहाच्या आवारात एन्ट्री केल्यानंतर प्रत्येक शिवसैनिक ‘शिवसेना जिंदाबाद…’, ‘मुंबई महापालिका जिंकायचीच’, ‘एकच ब्रँड… ठाकरे ब्रँड…’ अशी घोषणाबाजी करीत होते. त्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अनेकांनी निर्धार मेळाव्याच्या फलकासोबत सेल्फी काढली आणि पालिकेवर भगवा फडकवण्याच्या निर्धाराशी शिवसेना पदाधिकारी कटिबद्ध झाले. महिला शिवसैनिक भगवी साडी परिधान करून आल्या होत्या.
गद्दारांविरेधात झळकले फलक
मुंबई शहर आणि उपनगरांतून दाखल झालेल्या हजारो शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह अतुलनीय होता. खचाखच गर्दीने भरलेल्या सभागृहात अनेक शिवसैनिकांच्या हातामध्ये मुंबई महापालिका जिंकण्याच्या निर्धाराचे फलक झळकले. यात विरार येथून आलेल्या दिनेश आदावडे यांनी मेळावा संपन्न होईपर्यंत हातामध्ये धरलेला फलक लक्षवेधी ठरला. ‘महाराष्ट्रातील लांडग्यांनो, लाचारांनो… लाज वाटते तुमची…’ अशा शब्दांत आदावडे यांनी गद्दारी करणाऱ्यांविरोधात फलकाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला.






























































