उद्धव ठाकरेंना पाहण्यासाठी अयोध्यावासीयांची धडपड; गल्ल्या पॅक, गच्च्या फुल्ल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>श्रीरंग खरे । अयोध्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जवळून पाहण्यासाठी अयोध्यावासीयांची धडपड सुरू होती. गल्लोगल्ली प्रचंड गर्दी जमली होती. गल्ल्या भरल्यानंतर, दूमजली घरांच्या गच्च्यांवर फुल्ल गर्दी जमली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना पाहण्याची आम्हाला कधी संधी मिळाली नाही त्यामुळे त्यांच्या सुपूत्राला जवळून पाहण्याची संधी मिळाल्याने मी आनंदीत असल्याचं आशीर्वादोत्सव कार्यक्रमासाठी आलेल्या कमलेश मिश्र यांनी म्हटले. कार्यक्रमस्थळी मोजक्या लोकांना, निमंत्रितांना प्रवेश असल्याने अयोध्यावासीयांनी लक्ष्मण किलाच्या लगत असलेल्या बैठ्याघरांच्या गच्च्यांवर जागा पकडली होती.

हिंदुस्थानच्या उत्तरेत साधू-संत-महंत यांना यांचे विशेष महत्व आहे. त्यांच्या दिनचर्येत सहसा बदल होत नाही. पहाटे लवकर उठतात. त्यामुळे दुपारी त्यांची आरामाची वेळ असते मात्र शिवसेनेच्या आशीर्वादोत्सवासाठी आपल्या रोजच्या दिनक्रमाला बाजूला सारत सर्व संत-महंतांनी आराम न घेता लक्ष्मण किला येथे हजेरी लावली. दुपारी 2 च्या सुमारास हे सर्व संत, महंत, पुजाऱ्यांसाठी नियोजित केलेल्या जागेवर विराजमान झाले होते.

आशीर्वादोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या मंचाच्या एका बाजूला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छबी असलेले भव्य होर्डिंग लावण्यात आले होते. मंचाच्या दुसऱ्या बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भव्य होर्डिंग लावण्यात आले होते. या दोघांच्या छबीकडे पाहून आणि होर्डिंगवरील ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेकडे पाहून पाहून संत महंत प्रचंड प्रभावित झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्यावरून आणलेल्या पवित्र मातीचा कलश लक्ष्मण किला मध्ये पूजेसाठी ठेवण्यात आला होता. राम मंदिर निर्माणाच्या पवित्र कार्यसाठी या पवित्र मातीचा वापर केला जाईल.