
सामना प्रतिनिधी । परभणी
पीककर्जासाठी होत असलेली आडवणूक, तुटपुंज्या कर्जमाफीतील अडचणी यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सोमवारी शिवसेनेच्या वतीने जिल्हाभरातील बँकाच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. परभणीसह जिल्ह्यातील पूर्णा, सेलू, गंगाखेड, पालम, सोनपेठ, पाथरी, मानवत, जिंतूर या सर्वच तालुक्यात शिवसैनिक व शेतकऱ्यांनी मिळून त्या-त्या ठिकाणच्या बँकासमोर हे ठिय्या आंदोलन केले. आंदोलनानंतर संबंधीत बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निवेदनही देण्यात आले. या आंदोलनानंतर संबंधीत बँकांनी मात्र पीककर्जासाठी अनुकूलता दर्शवित शेतकऱ्यांना आता लगेचच पीककर्ज देण्यास सुरू करणार असल्याचे सांगितले.
शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मिळून हे आंदोलन पार पडले. शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडला असताना बँकेकडून शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कर्जमाफ तसेच पीककर्ज वाटप प्रकरणात शेतकऱ्यांची सतत अडवणूक होत आहे. बँकेत दलालांचा सुळसुळाट वाढला असून कर्जप्रकरणी दलालांमार्पâत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुट होत आहे. तसेच शासनाच्या कर्जमाफीची यादी अद्यापपर्यंत बँकेने जाहिर केलेली नसून दीड लाखांपेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांकडून देखील पाच ते सहा हजार रुपयांची बँकेकडून वसुली केली जात आहे. नवीन पीककर्ज वाटप करताना त्यांची अडवणूक केली जात आहे. बँकेकडून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना नो ड्यूज देखील देण्यात आलेले नाहीत. मागील आठवभरापासून बँकेचे प्रिंटर बंद आहे. शेतकऱ्यांना होत असलेल्या या आडवणुक प्रकरणी शिवसेना रस्त्यावर उतरली असून जिल्हाभरातील बँकासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
परभणीतील नवा मोंढा भागातील एस.बी.आय.च्या कृषी विकास शाखेसमोर झालेल्या आंदोलनात विधानसभाप्रमुख माणिक पोंढे, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, युवासेना युवाधिकारी अर्जुन सामाले, कृउबा उपसभापती दिलीप आवचार, संचालक संदीप भंडारी, रावसाहेब रेंगे, नगरसेवक अतुल सरोदे, दलित आघाडा जिल्हाध्यक्ष संजय सारणीकर, जनार्दन सोनवणे, पांडुरंग काळदाते, बाळासाहेब पारवेकर, वसंतराव रेंगे, मारुती इक्कर, रामराव रसाळ, अमोल भिसे, कैलास शिंदे, पिराजी आहेरकर, नारायण खिस्ते, शिवाजी शेंद्रे, दत्ता गरड, रमेश देशमुख, नारायण राऊत, यशवंत कदम, श्रीराम आमरळ, कैलास गाकयवाड, आश्रोबा भोकरे, सोपानराव देशमुख, उद्धव गायकवाड, अर्जुन रणेर, प्रभाकर ढोले, मानाजी भोसले, भानुदास कदम आदींचा सहभाग होता.
सेलू येथे एसबीआय समोर, मानवत येथे भारतीय स्टेट बँकेसमो पालम येथे स्टेट बँक ऑफ इंडिया समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पाथरी येथे भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर गंगाखेडात खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, आय.डी.बी.आय. बँकेसमोर तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे, बाजार समितीचे सभापती बालासाहेब निरस, सखूबाई लटपटे व शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले.
शिवसेना जवाब दो आंदोलन करणार -विशाल कदम
गत वर्षांपासून सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर पैसाही जमा झाला आहे.परंतू बँकेचे काही मुजोर अधिकारी शेतकऱ्यांना पीकर्जासाठी वेठीस धरत आहेत. पेरणीच्या तोंडावर शेतकरी हवालदिल झाला असून कर्जवाटप त्वरीत सुरू करावे अन्यथा येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील बँक कर्मचाऱ्यांना कोंडून शिवसेना जबाब दो आंदोलन करणार, असा ईशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी दिला.




























































