
धोकादायक पोल, गंजलेल्या तारा वेळीच न बदलल्याने अवकाळीच्या तडाख्यात रायगड जिल्ह्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा बंद झाला आहे. याबाबत ठिकठिकाणच्या कार्यालयांशी संपर्क साधल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या गलथान कारभाराविरोधात पेणमध्ये आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महावितरणवर जोरदार धडक देत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
पेण शहरासह तालुक्यात गणपतीचे अनेक कारखाने असून वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका गणपती कारखानदारांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. अशाच पद्धतीने रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाच्या नावाखाली वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. याव्यतिरिक्त भरमसाट येणारे बिले, होल्टेज कमी जास्त होऊन विद्युत उपकरणे नादुरुस्त होणे, महावितरणकडून स्मार्ट मीटरची सक्ती, अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना अरेरावीची भाषा यामुळे वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
… तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार
शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर व पेण तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आज महावितरणच्या कार्यालयावर धडक देत निवेदन दिले. तसेच सर्व मागण्या मान्य न झाल्यास ५ जूननंतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात शिवसेनेचे समन्वयक नरेश गावंड, माजी सभापती संजय भोईर, घनश्याम कुथे, जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे, युवासेना विस्तारक सुधीर ढाणे, चेतन मोकल, भगवान पाटील, राजू पाटील, वसंत म्हात्रे, दर्शना जवके, महानंदा तांडेल, मेघना चव्हाण, सुरेखा तांडेल, लव्हेंद्र मोकल, शिवाजी म्हात्रे, चंद्रहास म्हात्रे, विनोद म्हात्रे, नीलेश म्हात्रे, सनी पाटील, नवीन म्हात्रे, दीपक पाटील, नंदू मोकल आदी उपस्थित होते.





























































