
असंख्य शिवसैनिकांच्या आयुष्यातील ‘सोनेरी दिवस’ असणाऱया, महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील प्रत्येक नागरिकाला स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा देणाऱया शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी झाली. पावसाची पर्वा न करता हजेरी लावलेल्या लाखो शिवसैनिकांमुळे ऐतिहासिक शिवतीर्थावर जणू निष्ठेचा महासागरच लोटला. शिवसेनेची भक्कम ताकद आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांवरील निस्सीम प्रेम, आदर, श्रद्धा आणि निष्ठेचे दर्शन अवघ्या जगाला झाले.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाची चिंता सर्वांना सतावत होती. मात्र निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी जनतेने ही चिंता भेदून पावसाची पर्वा न करता ऐतिहासिक दसरा मेळाव्याला हजेरी लावली. दादर रेल्वे स्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानापर्यंत शिवसैनिकांच्या रांगा लागल्या होत्या. अगदी लहानग्यांपासून वृद्ध शिवसैनिक तसेच महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. दादर स्थानकापासून शिवतिर्थ गाठेपर्यंत ‘शिवसेना झिंदाबाद…’ ‘उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आवाज कुणाचा..’ अशा गगनभेदी घोषणा देत शिवसैनिकांनी संपूर्ण दादर परिसर दणाणून सोडला. भगव्या टोप्या, भगवी उपरणे, भगव्या छत्र्या, भगवे झेंडे आणि हातात धगधगती मशाल घेऊन लाखो शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला हजेरी लावली. शिवतीर्थावर आगेकूच करताना वाहतुकीला कोणताही अडसर होता कामा नये, याची खबरदारी शिवसैनिकांनी घेतली. छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा संपूर्ण परिसर चहूबाजूंनी भगवे झेंडे आणि भगव्या पताकांनी सजला होता. गर्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिवसेना कार्यकर्ते जागोजागी सेवेसाठी तत्पर राहिले. पावसाच्या रिपरिपीमुळे मैदानात चिखल झाला होता. डोक्यावर पावसाचा मारा आणि पायाखाली चिखल असूनही निष्ठावंत शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यातील ज्वलंत विचारांचे सोने लुटण्यासाठी शेवटपर्यंत मैदान सोडले नाही.
अलोट गर्दीत पोलिसांचे चोख व्यवस्थापन
दसरा मेळावा सुरु होण्याआधी दुपारी तीन वाजल्यापासूनच शिवसैनिकांची छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर रिघ लागली होती. अलोट गर्दी होण्याच्या शक्यतेने मुंबई पोलिसांनी आधीच चोख नियोजन केले होते. राज्याच्या कानाकोपऱयातून आलेल्या शिवसैनिकांच्या गाडय़ांच्या पार्किंगची माटुंगा येथील पाच उद्यान तसेच इतर परिसरात व्यवस्था केली होती. त्यामुळे दादरमध्ये वाहतुकीमध्ये कुठलाही व्यत्यय आला नाही. मेळाव्यात अखंडितपणे शिवसैनिकांचा ओघ सुरू होता. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेत गर्दीचे योग्य नियोजन करण्यात यश मिळवले.
वाजतजागत आले शिवसैनिक
राज्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या अनेक शिवसैनिकांनी वेगवेगळी वाद्ये वाजवत शिवतीर्थ गाठले. शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार बनण्यापूर्वी शिवसैनिकांनी माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोरील परिसरात शिवसेनेचा जयघोष केला. ‘शिवसेना आमचीच.. मुंबई आमचीच…’ असा नारा देत शिवसैनिकांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयाचा निर्धारही व्यक्त केला.
विरारच्या चिमुकल्या शिवसैनिकाची शानदार एण्ट्री
दसरा मेळाव्याला लहानग्या शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली होती. वेगवेगळी आकर्षक वेशभूषा करून मुले शिवतीर्थावर दाखल झाली होती. यात विरार येथून आलेल्या समर्थ आदावडे या चार वर्षीय शिवसैनिकाची निष्ठा सर्वांनाच थक्क करणारी ठरली. लहानग्या शिवसैनिकाने भगव्या रंगाच्या सायकलवरून मेळाव्याच्या ठिकाणी शानदार एण्ट्री केली. त्याच्या निष्ठेला सर्वांनीच दाद दिली. त्याच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी शिवसैनिकांची झुंबड उडाली होती. समर्थ हा त्याच्या वडिलांसोबत न चुकता शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्याला उपस्थित राहतो.
दादर परिसर भगवामय
शिवतीर्थावर चाललेल्या असंख्य शिवसैनिकांच्या गर्दीने संपूर्ण दादर परिसर भगवामय झाला होता. भरपावसात वयस्कर मंडळी, महिला आणि लहानग्या शिवसैनिकांचा जणू शिवतीर्थावर निष्ठsचा महापूरच लोटला होता. भगव्या टोप्या, भगवी उपरणे, भगवे झेंडे, भगव्या छत्र्या आणि हातामध्ये धगधगती मशाल घेऊन शिवसैनिकांनी शिवतीर्थाकडे आगेकूच केली. दादरच्या सेनापती बापट मार्ग, वीर कोतवाल उद्यान मार्ग, केळकर मार्ग, एस. के. बोले मार्ग आदी सर्वच मार्ग शिवसैनिकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
शिवसेना भवन परिसरात निष्ठावंतांची गर्दी
राज्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या दादर रेल्वे स्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानापर्यंत लांबलचक रांगा लागल्या होत्या. ‘उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’… ‘शिवसेना झिंदाबाद…’, ‘आवाज कुणाचा… शिवसेनेचा…’ अशा गगनभेदी घोषणा देत शिवसैनिकांचे जथेच्या जथे शिवतीर्थाकडे मार्गस्थ होत होते. यादरम्यान शिवसेना भवन परिसरात शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. शिवसेना भवनापुढे नतमस्तक होत होते. शिवसेना भवन देखील आकर्षक विद्युत रोषणाईने उजळले होते.
गद्दारांचे करायचे काय, खाली डोके वर पाय…
निष्ठावंत शिवसैनिकांनी शिवसेनेच्या घोषणा देतानाच गद्दारांचा चांगलाच समाचार घेतला. ‘उद्धवसाहेब अंगार है, बाकी सब भंगार है…’, ‘गद्दारांचे करायचे काय, खाली डोके वर पाय…’, ‘नीम का पत्ता कडवा है… एकनाथ शिंदे नालायक आहे’ अशा प्रकारे गद्दारांच्या निषेधाच्या घोषणा निष्ठावंत शिवसैनिकांनी दिल्या.
भगव्या साडय़ा घालून आणि हातात भगवे झेंडे घेऊन शिवसेनेच्या रणरागिणीदेखील मोठय़ा संख्येने मेळाव्यासाठी आल्या होत्या. बच्चेपंपनीदेखील आपल्या पालकांसह विचारांचे सोने लुटण्यासाठी आली होती.
दिव्यांग शिवसैनिकाची जिद्द
संतोष पंजाबी हे दिव्यांग बांधव बोईसर येथून लोकलमधून प्रवास करत मेळाव्यासाठी दाखल झाले होते. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांच्या प्रेमापोटी गेल्या 35 वर्षांपासून मी मेळाव्याला न चुकता हजेरी लावतो, असे ते सांगतात.
उद्धवसाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही चिखलातच काय तर आगीतही बसू, असे मराठवाडय़ातून आलेल्या शिवसैनिकाने म्हटलेय. बीड जिह्यातील माजलगावहून हे निष्ठावंत शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी आले.
शिवसैनिकांच्या शिस्तीचे दर्शन
प्रभादेवीतील एल्फिन्स्टन पूल तसेच शीव ब्रिज बंद असल्यामुळे दादरच्या टिळक पुलावर ताण आला आहे. टिळक पुलावर वाहतूककोंडी होत असतानाच शिवसैनिकांनी मात्र प्रचंड शिस्तीचे दर्शन घडवले आणि असंख्य शिवसैनिकांनी रांगेची शिस्त पाळून शिवतीर्थ गाठले. रुग्णवाहिकांना मोकळी वाट करून देण्यासाठी शिवसैनिक तत्पर राहिले. दसरा मेळाव्यात शिवसेना नेत्यांची भाषणे सुरू झाल्यानंतरही शिवसैनिकांचा अखंड ओघ सुरूच होता. छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाबाहेरही उसळलेल्या तुडुंब गर्दीचे व्यवस्थापन करताना पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली. यावेळी वाहतूक नियंत्रण आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी शिवसेना कार्यकर्तेही तत्पर राहिले.
कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी केला मराठीचा जागर
कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या 800 हून अधिक शिवसैनिकांनी शिवसेनेचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांच्या नेतृत्वाखाली टाळ आणि ढोलकीच्या तालावर मराठीचा तसेच ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा जयघोष केला. मराठी बोला तुम्ही, मराठी वाचा… असे आवाहन भजनाच्या माध्यमातून करीत शिवसैनिकांनी परिसरातील वातावरण मराठीमय करून टाकले.
शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर व राज्य सरचिटणीस जितेंद्र सकपाळ यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शिव आरोग्य सेनेच्या वतीने दोन अॅम्ब्युलन्स व प्रथमोपचार पेंद्र उभारण्यात आले होते. या वेळी शिव आरोग्य सेना कांदिवली विधानसभा समन्वयक डॉ. संतोष भानुशाली, शिवाजी नगर – मानखुर्द विधानसभा समन्वयक डॉ.आनंद बाबर, अलिबाग जिल्हा आरोग्य सचिव साक्षात म्हात्रे, शीव विधानसभा सचिव विकास भोसले, अविनाश पाटील उपस्थित होते.
रायरेश्वर येथील धगधगती शिवज्योत शिवतीर्थावर
पुणे जिह्यातील भोर तालुक्यातील शिवसैनिक विकास बांदल आणि त्यांचे सहकारी दसरा मेळाव्यासाठी ऐतिहासिक रायरेश्वर मंदिरातून धगधगती शिवज्योत घेऊन पायी चालत शिवतीर्थावर दाखल झाले होते. 27 सप्टेंबरला रायरेश्वर मंदिरात रुद्राभिषेक करून शंखनाद केला आणि शिवज्योत घेऊन पायी निघालो. गेली चार वर्षे आमच्या साहेबांसाठी आम्ही शिवज्योत घेऊन येतो, असे त्यांनी सांगितले.
मुस्लिम मावळय़ाने वेधले लक्ष
दसरा मेळाव्यासाठी अजिज मोमिन हा मुस्लिम मावळा संगमनेर येथून शिवतीर्थावर दाखल झाला होता. या मुस्लिम मावळय़ाने अंगावर परिधान केलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले. ‘गद्दारांना विकत घेण्यासाठी 50 खोके आहेत…पण पूरग्रस्त शेतकऱयांना अवघे 85 रुपये गुंठा मदत जाहीर करून सरकारने गोरगरीब शेतकऱयांची चेष्टा केली आहे,’ असा सणसणीत टोला मोमिन यांनी लगावला.
शिवसैनिकांसाठी अल्पोपाहार
राज्याच्या कानाकोपऱयातून शिवतीर्थावर येणाऱया शिवसैनिकांसाठी शिवसेना शाखा क्र. 10 च्या वतीने अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शाखा क्र. 204 आणि माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या वतीनेदेखील शिवसैनिकांना पुलाव वाटप करण्यात आले. तसेच शिव विधी व न्याय सेनेतर्फे शिवसैनिकांना 10 हजार लाडू वाटप करण्यात आले. यावेळी शिव विधी व न्याय सेनेचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनवणे, सचिव अॅड. सुमीत घाग, अॅड. कोजल कदम, अॅड. विनोद शिंदे, संतोष घाग, अॅड. विकास गोरडे उपस्थित होते.
भगवे झेंडे, उपरणी खरेदीसाठी झुंबड
भगवे झेंडे, भगव्या टोप्या, शिवबंधन, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची छबी असलेली उपरणी, मशाल चिन्ह असलेली किचेन, बिल्ले खरेदी करण्यासाठी स्टॉलवर शिवसैनिकांची झुंबड उडाली होती.