
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रभादेवी मंदिरात हार-तुरे, नारळ, प्रसाद आदी पूजासाहित्य नेण्यास घातलेली बंदी शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे उठवण्यात आली आहे. या बंदीमुळे स्थानिक व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. शिवाय भाविकांचाही याला विरोध होता. मात्र आता ही बंदी उठवण्यात आली आहे.
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर हे मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरातील गणेशभक्तांचे सर्वाधिक आवडते श्रद्धास्थान आहे. मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे खबरदारी म्हणून मंदिरात हार-तुरे, नारळ नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर केल्यानंतरही सिद्धिविनायक मंदिरात पूजा साहित्य नेण्यास बंदी उठवण्यात आली नव्हती. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिर परिसरातील हार, तुरे, मिठाई यांच्यासह सर्वच छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांचा व्यवसाय ठप्प झाला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार महेश सावंत यांनी सिद्धिविनायक मंदिर न्यासच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून ही बंदी उठवण्याची मागणी केली होती. याची दखल घेत पूजा साहित्य, प्रसाद नेण्यास न्यासाने परवानगी दिली आहे.