संजय राऊत यांना अंतरिम जामीन मंजूर

बेकायदेशीर सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका, असे पोलीस, प्रशासनाला आवाहन केल्याप्रकरणी दाखल गुह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.

नाशिक दौऱयावर असताना खासदार संजय राऊत यांनी 12 मे रोजी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्य सरकार बेकायदेशीर ठरले आहे, असे त्यांनी सांगितले. या बेकायदेशीर सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका, असे आवाहन पोलीस, प्रशासनाला केले होते. यावर आक्षेप घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाने नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात खासदार संजय राऊत यांच्याविरोधात कलम 3 (1) आणि भादंवि कलम 505 (1) (ब) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संजय राऊत यांना जिल्हा न्यायाधीश-6 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नाशिक आर. आर. राठी यांनी पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर पुढील तारखेपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. खासदार संजय राऊत यांच्या वतीने ऍड. एम. वाय. काळे यांनी काम पाहिले.