
विरोधी पक्षांनी धारेवर धरल्यानंतर फडणवीस सरकारने लाजेकाजेस्तव शेतकर्यांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, हे पॅकेज दिशाभूल करणारे असून सरकारने फक्त कागदी घोडे नाचवले असल्याचा स्पष्ट आरोप शिवसेनेने केला आहे. अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकर्यांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या वतीने काढण्यात येणारा हंबरडा मोर्चा विक्रमी होणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
शनिवारी काढण्यात येणार्या हंबरडा मोर्चाची माहिती देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. महापुरात घरदार, शेत सगळे काही वाहून गेल्याने जगायचे कसे, असा त्याच्यासमोर प्रश्न आहे. संकटाच्या वेळी सरकारने शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित होते. परंतु, फडणवीस सरकार पॅकेजच्या नावाखाली कागदी घोडे नाचवण्यात मग्न असल्याचा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला. संपूर्ण राज्यासाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यातून पायाभूत सुविधांसाठी १० हजार रुपये सरकारने काढून घेतले आहेत. २१ हजार कोटी रुपये राज्यभरातील शेतकर्यांना देण्यात येणार असून, त्यात मराठवाड्याच्या वाट्याला अत्यंत तुटपुंजी रक्कम येणार असल्याचे दानवे म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकर्यांशी संवाद साधला असता शेतकर्यांनीच मोर्चा काढण्याची सूचना केली होती. त्यानुसारच हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. मोर्चाच्या तयारीसाठी शिवसेना पदाधिकार्यांनी संपूर्ण मराठवाडा पिंजून काढला आहे. शनिवारी निघणार्या या मोर्चात मराठवाड्यातून हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. क्रांतीचौकातून मोर्चा निघणार असून, गुलमंडीवर मोर्चाचा समारोप होणार आहे. समारोपाच्या ठिकाणी शेतकरी मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील, असेही त्यांनी सांगितले.
शेतकरी मोर्चाचा सरकारने घेतला धसका!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार्या शेतकरी मोर्चाचा धसका घेत राज्य सरकारकडून पॅकेज जाहीर करण्यात आले. परंतु, मदतीचे वाटप कधी होणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे. दिवाळी तोंडावर आली असतानाही शेतकर्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झालेली नाही, यावरूनच सरकारची नियत दिसून येते, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
उद्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा हंबरडा मोर्चा, उद्धव ठाकरे करणार नेतृत्व
पंतप्रधानांना मराठवाड्यात येण्यास वेळ नाही
मराठवाडा संकटात आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठवाड्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. दोन दिवस मुंबई दौर्यावर आलेल्या पंतप्रधानांना भाजपच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यासाठी वेळ मिळाला पण मराठवाड्यातील शेतकर्यांचे अश्रु पुसण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता, असा टोलाही शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी लगावला. केंद्र सरकार ओडिशा, तामिळनाडू, बिहारला मदत करते, पण मराठवाड्याकडे मात्र पाठ फिरवते, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.
उद्धव ठाकरे शिवसेना भवनाला भेट देणार
शेतकरी मोर्चाचा समारोप झाल्यानंतर संभाजीपेठेत शिवाई ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या शिवसेना भवनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. ही केवळ औपचारिक भेट असून, या ठिकाणी कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी सांगितले.