
सामना प्रतिनिधी । रायगड
गेली अनेक वर्षे लटकलेले मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण.. रोहा ते वीर कोकण रेल्वेचे प्रगतिपथावर असलेले दुपदरीकरण.. तब्बल पाच हजार अत्याधुनिक टॅब देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी केलेला प्रयत्न असो वा ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी दिलेला कोट्यवधींचा निधी, यामुळे शिवसेना नेते केंद्रीय मंत्री अनंत गीते पुन्हा एकदा रायगडचा ‘गड’ राखतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्वच्छ प्रतिमा आणि विकासाची दृष्टी
अनंत गीते रायगड लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असून गेल्या 10 वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर शिवसेना-भाजप युतीने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गीते यांचा मतदारसंघाशी सातत्याने असलेला संपर्क, विकासकामांसाठी त्यांनी विविध योजनांमधून उपलब्ध करून दिलेला कोटय़वधींचा निधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेला भेटीसाठी सहज उपलब्ध होणारे गीते बाजी मारतील, असे चित्र आहे. त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि विकासाची दृष्टी ही जमेची बाजू ठरत आहे.
राष्ट्रवादीत पडझड
गेल्या पाच वर्षांत रायगड राष्ट्रवादीत मोठी पडझड झाली आहे. सुरेश टोकरे, राजा केणी, विजय कवळे, राजीव साबळे, श्याम भोकरे, महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. तटकरेंना घरातच भाऊबंदकीला तोंड द्यावे लागत आहे. भास्कर जाधवांची नाराजी तटकरेंसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
शेकापशी जुळवलेली ‘गणिते’ कागदावरची
खासदारकीची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तटकरेंनी कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापच्या बाळाराम पाटील यांना पाठिंबा दिला. त्यांच्या प्रचारासाठी कोकणात फिरले. पण ही केवळ तटकरे आणि जयंत पाटील या नेत्यात ऍडजेस्टमेंट ठरली. नेत्यांची सोय झाली, पण शेकाप, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांचे मात्र मनोमिलन झाले नसल्याचे चित्र आहे. 2014 ला राष्ट्रवादीला अंगावर घेणाऱया शेकापच्या कार्यकर्त्यांना 2019 ची आघाडी पचनी पडलेली नाही. त्यामुळे तटकरेंची ‘गणिते’ कागदावरची ठरतील, अशी चर्चा आहे.
काँग्रेसच्या नाराजीचा फटका बसणार
तटकरेंनी काँग्रेस खिळखिळी करण्याची एकही संधी सोडली नाही. माजी मंत्री पेणचे रवी पाटील, अलिबागचे मधुकर ठाकूर यांना तटकरेंनी मागील विधानसभा निवडणुकांमध्ये गनिमीकाव्याने धोबीपछाड दिली. रायगड जिल्हा परिषदेतही काँग्रेस वरचढ होऊ नये म्हणून पद्धतशीर खेळी केली. काँग्रेसच्या या नाराजीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. ‘
हे करून दाखवले
- मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण वेगाने सुरू झाले.
- रोहा ते वीर कोकण रेल्वेचे दुपदरीकरण.
- उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा पेणपाठोपाठ रोह्यापर्यंत विस्तार.
- अलिबाग ते पनवेल रेल्वे प्रश्नही धसास लावला.
- पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅबचे वाटप.
- प्रत्येक तालुक्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका.
खासदार फंडातून गावागावात विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे मी केवळ विकासाचाच विचार केल्याने शेकाप-राष्ट्रवादीच्या स्वार्थी आघाडीला घाबरण्याची मला गरज नाही. शिवसेनेचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला आहे.































































