लिहून घ्या! हे सरकार कोसळणारच!! आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा

aaditya-thackeray

महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची ‘शिव संवाद’ यात्रा आजपासून सुरू झाली. या यात्रेची सुरुवात भिवंडी येथून झाली असून शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे दणक्यात स्वागत केलं. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी बंडखोर आमदारांचा खरपूस समाचार घेतला. ‘ही गद्दारीच आहे आणि गद्दार म्हणूनच माथ्यावर घेऊन तुम्हाला फिराव लागणार’, अशा शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसेच शिंदे व भाजप सरकार हे घटनाबाह्य असून ते कोसळणारच असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

”गेला एक महिना बरोबर 20 जून ते काल 20 जुलै पर्यंत महाराष्ट्रात दुखदायक वातावरण होतं. हे दु:ख विसरायला मी हा संवाद दौरा घेतला आहे. आपल्याकडून प्रेम, आशिर्वाद घ्यायला मी आलो आहे. जे दृश्य मी पाहिलंय ते क्लेशदायक, दुखदायक होतं. तुम्ही देखील, शिवसैनिकांनी जवळून पाहिलंय. आपण ज्यांना प्रेम दिलं, ओळख दिली, तिकिटं, मंत्रीपदं दिली. ते जसे आपल्याला सो़डून गेले. धोका देऊन गेले, हे तुम्हाला तरी पटणारं आहे का? महराष्ट्रात जे काही महिनाभरापासून सुरू आहे ते तुम्हाला पटणारं आहे का?. लोकशाही म्हणून तुम्हाला पटणारं आहे का? काय कमी दिलं यांना आपण?  मी आज ठाण्यात आलो तेव्हा केदार दिघे माझं स्वागत करायला उभे होते. अनेकही इतर कार्यकर्ते होते. पण मी वाट बघत होतो त्याच चेहऱ्यांची ज्यांना वर्षानुवर्ष मी बघत आहे. लहानपणापासून बघत आहे. स्वत:चं कुटुंब म्हणून सोबत बघितलं आहे. कधीही घऱी यायचे जे हवं ते मागायचं. हे सगळं सुरू असताना असं नेमकं काय घडलं की यांना आपल्या पाठीत खंजीर खुपसावा वाटला. काय कमी दिलं आपण यांना? इथे शिवसैनिक आहेत, युवासेनिक आहेत, महिला आघाडी आहे, कामगार सेना आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की कुठेही शिवसेना हललेली नाही, हलले आहेत ते ज्यांना खाऊन खाऊन अपचन झालं ते. पण ही जी मंडळी आहेत. ज्यांना ज्यांना आपण देऊ शकलो जे काही होतं ते मस्त तिथे आनंदात जाऊन बसलेले आहेत व यांच्या मागणीमुळे ज्यांच्यावर आमच्याकडून अन्याय झाला ते सोबत आहेत. प्रेम करतात म्हणून सोबत आहे’, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले

”गेली अडीच वर्ष मी बघत आहे. मविआचं सरकार स्थापन केलं. त्या काळात बघा कुठेही धर्म, जातपात, भाषेचा भेदभाव न करता 24 तास सेवा केली. विकासाची कामं करत आलो. कदाचित चुकलं आपलं हे की आपण राजकारण नाही केलं. उद्धव ठाकरे असो मी असो शिवसैनिक म्हणून तुम्ही असाल. आपल्याला राजकारण जमलं नाही. म्हणून आज आपल्यावर ही वेळ आली आहे. आपलं ब्रीद वाक्य हेच आहे की 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण. हेच तत्व घेऊन चालत आलोय. याच कारणामुळे आपल्या हातून सत्ता गेलीय. आपण कधीच विरोधकांच्या आमदारांना सतवत नाही. याचे प्रोटेक्शन काढ, यांना तडीपार कर असले धंदे कधी आपण केलं नाही. आपण स्वत:च्या आमदार खासदारांवर कधी लक्ष ठेवलं नाही. विश्वास ठेवला. जणू हा अंधविश्वास होता. तोच विश्वास आता आपल्याला धोका देऊन गेलेला आहे. पण हा विश्वास शिवसैनिकांवर कायम राहणार कारण विश्वास हा शिवसैनिकांवर ठेवायचा नाही तर कुणावर ठेवायचा? जे गेले त्यांच्या अंगात, रक्तात शिवसेना कधीच नव्हती. शिवसैनिक असते तर हिमतीने उभे राहिले असते. मी बघतोय काही मुलाखतीत ते म्हणतायत की आम्ही उठाव केला बंड केलं. पण हा उठाव नाही ही गद्दारीच आहे आणि गद्दार म्हणूनच माथ्यावर घेऊन हे फिरणार. बंड करायला उठाव करायाल हिंमत लागते. ताकद लागते’, असे त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुनावले आहे.

आज मी ठाण्यात, भिवंडीत आलो. पहिल्यापासून ठाण्यातील य़ुवासेना असेल महिला आघाडी असेल स्थानिक नागरिक येऊन भेटत आहे. कारण हा माणून चांगला माणूस आहे, सच्चा माणूस आहे. यांना बंड करायचं असतं तर ते तिकडच्या तिकडे उभे राहिले असते सुरतेला गुवाहटीला पळून गेले नसते. हालत बघा यांची… हे जे स्वत:ला बंडखोर, शूरवीर समजतायात. जेव्हा काहीतरी असं करायचं होतं तेव्हा आपल्या पक्षप्रमुखांकडे जाऊन सांगायची हिंमत झाली नाही की साहेब हे असं करायला पाहिजे. पक्षाचा आदेश पाळायची हिंमत झाली नाही. बंड करायचा असता तर महाराष्ट्रात राहून बंड केलं असतं, सुरतेला पळाले नसते. गुवाहटीत भयानक पूर आलेला असताना, तिथल्या लोकांचे हाल सुरू असताना, त्यांना घर नव्हतं. आपले हे 40 लोक तिथे मजा मारून आले आहेत. आणि नंतर गोव्यात आले. ज्यांनी गद्दारी केली. त्यांनी लोकांमध्ये फिरावं अशी माझी त्यांना विनंती आहे. ज्या लोकांनी डोक्यावर घेऊन त्यांना विधानभवनात, संसदेत पोहचवलं. त्यांनी लोकांची भावना ऐकावी. काय लोकांची भावना आहे ते ऐका, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हिंमत असेल तर निवडणूकीला सामोरे जा

”राष्ट्रपती निवडणूकीतही आपण आदिवासी ताई राष्ट्रपती बनत आहेत त्यांना पाठिंबा दिला. त्या मतदानासाठी देखील आधी हॉटेलमध्ये डांबलं, मग बसमधून मतदानासाठी आणलं. काय हालत झाली आपल्या आमदारांची. मी त्यांना एकच सांगतोय. स्वत:हून पळून गेलेयत. त्यांच्यावर जी काही दडपणं असतील. तिथे तुम्ही गेलायत आनंदात रहा. आमच्या मनात तुमच्याविषयी राग नाही. दुख जरूर आहे की एका चांगल्या माणसाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही जा तिथे गेलात तिथे आनंदात रहा. पण तिथे राहायचं असेल तर रहा. जे काही सोडवायचं आहे ते सोडवा. पण थोडी लाज उरली असेल तर आमदाराकीचा राजीनामा द्या. निवडणूकीला सामोरे जा. जे जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल. पण जर तुम्हाला परत यायचं असेल, ज्यांना ज्याना परत यायचंय त्यांना आम्ही हेच सांगितलं आहे की मातोश्रीचे दरवाजे 24 तास उघडे असतात आमची मनं मोठी आहेत, आमचं हृदय मोठं आहे.” असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिले आहे.

हे सरकार कोसळणारच

राज्यात काय राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रात पूर आले आहे. लोकं त्रस्त आहेत. पण आपलं जे दोन लोकांचं मंत्रीमंडळ आहे. निर्णय पण हेच घेतात.बसतात पण हेच एकत्र. हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार हे नक्की तुम्ही लिहून घ्या. हे तिथे दिल्लीत बसले आहेत. महाराष्ट्रात पूर आलाय, अतिवृष्टी होतेय हे ते बघत नाहीएत. ते बघतायत ते फक्त युवासैनिकाला, महिला आघाडीला फोन करा धमकी द्या कोण येतंय ते बघा. पण हे सगळे कुणी घाबरत नाही. हे शिवसैनिक नाहीत. घाबरणारे असते तर सुरतेला व गुवाहटीला आले असते तुमच्यासोबत, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी शिंदे भाजप सरकारवर निशाणा साधला.

ही महाराष्ट्राशीच नाही तर माणूसकीशी गद्दारी

मविआचे सरकार असताना जातीय राजकीय दंगली झाल्या नाहीत. लोकांची कामं करत होतो. शास्वत विकास करत होतो. जंगल वाचवत होतो. कोविडच्या काळात देखील जगभरात महाराष्ट्राचं नाव बुलंद करणारे उद्धव ठाकरे होते. मी दहा वर्ष सक्रीय राजकारणात आहे. गावागावांमध्ये गेलो आहे. चांगली कामं केली आहेत. लोकांना भेटलो आहे. मला सतत एक गोष्ट सांगितली जायची की चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतं. कदाचित हे जे काही सुरू आहे. हे जे सर्कस आहे नाट्य आहे मला काहीच कळत नाही. स्वत:च्या महत्वकांक्षासांठी जे काही सुरू आहे ते हेच सिद्ध करतय की चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतं. मी आज हेच विचारायला आलो आहे की तुम्ही तयार आहात का जगाला दाखवायला की आपल्या सारख्या चांगल्या लोकांनाही राजकारणात स्थान असतं. उद्धव ठाकरेंसारख्या चांगल्या व्यक्तीला राजकारणात स्थान आहे. हाच प्रश्न विचारायला मी आलोय. कारण राजकारण 24 तास सुरू असतं. राजकारणाची पण एक पातळी स्तर असतो तो सोडायचा नसतो. किती राजकारण करायच? माणूसकी नावाचा काही प्रकार आहे की नाही. ही फक्त महाराष्ट्राशी गद्दारी झालेली नाही तर माणूसकीशी गद्दारी झालेली आहे.

उद्धव ठाकरे आजारी असताना केली गद्दारी

ही गद्दारी कधी करायची? ज्यावेळी आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल असतात. त्यांच्यावर एका आठवड्यात दोन सर्जरी होतात त्यावेळी… ज्या आठवड्यात ते हलू शकत नाही त्या आठवड्यात हे गद्दारी करतात. उद्धव ठाकरेंवर आरोप काय करतात तर उद्धव ठाकरे भेटले नाहीत. हो ते नाही भेटले दोन महिने. पण त्यांच्यावर दोन ऑपरेशन झाले होते. त्यांची परिस्थिती अशी होती की ते बेडवरून उतरू शकत नव्हते. तरी देखील ते मंत्रीमंडळाची बैठक घेत होते. महाराष्ट्राची कामं करत होते. व्हॉट्सअॅपवर फोनवर काम करत होते. त्यांना माहित होतं की मुख्यमंत्री जागेवरून हलू शकत नाही तेव्हा यांचं सुरू झालं की मी मुख्यमंत्री बनू शकतो का आपल्यासोबत किती आमदार येतील. त्यावेळी यांची ही कारस्थानं सुरू झाली. याला शिवसैनिक म्हणतात. जर आज बाळासाहेब, दिघेसाहेब असते तर त्यांनी आज काय न्याय दिला असता. ज्या माणसाला कोविड झाला. महाराष्ट्राला कोविड पासून वाचवलं. आपल्याशी सत्य बोलत राहिले. त्यावेळी शिवसेना फोडायच्या मागे लागतात. किती घाणेरडं हे राजकारण झालं आहे. मी आज 32 वर्षांचा आहे. मी काय कमी केलं.? कॉलेजसाठी असेल, पोलिसांसाठी, रस्त्यांसाठी, जंगलांसाठी काय कमी केलं आपण सगळं काही करत राहिल.