
‘पद्मविभूषण’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. त्यांनी जुलै महिन्यात शंभरीत पदार्पण केलं होतं. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर सकाळी 10.30वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वयाची 80 वर्षे शिवचरित्र प्रसाराचे काम, तब्बल 5 लाख किमीचा प्रवास, ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथाच्या 17 आवृत्त्या, जगभरात 25 हजार व्याख्याने, 3 कोटी रुपयांचा दानधर्म आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे महानाट्य ‘जाणता राजा’चे 1200 प्रयोग व एक कोटी प्रेक्षक असा बाबासाहेब पुरंदरे यांचा थक्क करणारा प्रवास आहे.
इतिहास जिवंत करणारी वाणी
प्रतापगडाच्या हडपांचा शिवचरित्राशी संबंधित कागद सापडल्याचा सांगावा आला म्हणून पुण्याहून भर आषाढाच्या पावसात सायकलवरून प्रतापगड गाठणाऱ्या बाबासाहेबांनी हजारो, लाखो कागद गोळा करून त्यातून त्यांनी शिवचरित्राची ओळ अन् ओळ लिहिली. इतिहास जिवंत करणारी वाणी बाबासाहेबांना लाभली. सरस्वतीनं प्रतिभेची मुक्तपणे उधळण केली आणि महाराष्ट्र रसात गायिलेलं शिवाजीराजांचं चरित्र अवघ्या महाराष्ट्रानं डोक्यावर उचलून धरलं.
किल्ले जतन करा
छत्रपती शिवरायांसंदर्भात वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधन होत आहे. संशोधनासाठी अभ्यास महत्त्वाचा असतो, याचे भान नवलेखकांनी बाळगले पाहिजे. आपल्याकडे डोंगरी, किनारी, सागरी, भुईकोट असे 352 किल्ले आहेत. किल्लेसंवर्धनासाठी जे करता येईल, ते केले पाहिजे. किमान 25 किल्ले जतन केले पाहिजेत, असे इच्छा पुरंदरे यांनी बोलून दाखवली होती.
दानशूरता
बाबासाहेबांना पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिदागीतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले. महाराष्ट्रभूषण या सन्मानाबरोबर दहा लाख रुपयांतले फक्त दहा पैसे स्वतःजवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखी पंधरा लाख रुपये घालून ती सर्व रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला त्यांनी दान केली.
2019 ला पद्मविभूषणाने सन्मान
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसारामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल केंद्र सरकारतर्फे 11 मार्च 2019 रोजी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला, परंतु प्रकृतिअस्वास्थ्यामुळे दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना त्यांच्या राहत्या घरी प्रदान केला. यावेळी तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
दोन वर्षांपूर्वी पत्नीचे निधन
दोन वर्षांपूर्वी पुरंदरे यांच्या पत्नी व ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्या 81 व्या वर्षाच्या होत्या. महिलांच्या सबलीकरणासाठी निर्मलाताईंचे मोठे कार्य आहे.

































































