
>> शिवानी गोंडाळ, मेकअप आर्टिस्ट
डोळा हा चेहऱ्यातील सर्वात नाजूक अवयव असल्यामुळे त्यावर आपण अशा प्रकारचा वेगवेगळा मेकअप केल्यावर त्याचा डोळय़ावर दुष्परिणामही होत असतो. त्यासाठी डोळय़ांना आराम देण्यासाठी डोळय़ांना थंडावा देण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय म्हणून काकडी, बटाटा, तसेच विटामिन सी, ए आणि बी रोजच्या आहारात जर तुम्ही वापरलं तर तुमचे डोळे नक्कीच तजेलदार दिसतील तसेच रोज रात्री झोपताना अनामिकाच्या सहाय्याने डोळय़ांना तेलाने हरकसा मसाज केला, तर डोळय़ांभोवती येणारी काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होते. डोळय़ांवरील ताण कमी करण्यासाठी तुम्ही दहा- पंधरा मिनिटं डोळय़ांचा वेगवेगळा व्यायाम केलात, तर तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
आपण आज जाणून घेऊया डोळय़ांच्या वेगवेगळय़ा आकाराप्रमाणे आय लाइनरचे विविध प्रकार. त्याद्वारे डोळय़ांना आणखीन चांगल्या प्रकारे उठाव आणता येतो.
आय लाइनरच्या विविध प्रकारात लिक्विड लाइनर, क्रीम लाइनर, जेल लाइनर तसेच मस्काराचेही ट्रान्स्परंट मस्करा, पावडर मस्कारा असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. डोळय़ांच्या मेकअपमध्ये काजळ, आय लाइनर, आय शाडो, मस्करा यांच्या विविध पद्धतींचा वापर केला जातो आणि डोळे सुंदर दिसण्यासाठी विविध ब्रँड्स नवीन आणि आकर्षक टिकाऊ नवनवीन साहित्य बाजारात आणत असतात.
आय पेन्सिल ही पेन्सिलसारखी असून यात विविध रंग असतात. यामध्ये वॉटरप्रूफ, स्मज प्रूफ, स्मजी असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. नवीन शिकावू प्रत्येकासाठी सर्वात सोपा व चांगला पर्याय म्हणजे आय पेन्सिल. ही वापरताना पापणीच्या सर्वात जवळच्या भागावर लावावी व आपल्याला त्याचं टोक हवं असल्यास त्यासाठी शार्प लाईन काढून हलकीशी बाहेर काढावी. स्मोकी इफेक्टसाठी स्मजी पेन्सिलचा वापर करावा.
कॉन्टॅक्ट लेन्स – सध्या डोळय़ांचा मेकअप करताना कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरण्याची पद्धत रूढ होत चालली आहे. वेगवेगळय़ा प्रकारचे वेगवेगळय़ा रंगांच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये आपल्या कपडय़ाच्या रंगानुसारसुद्धा लेंसेस आपल्याला मिळतात. निळा, हिरवा, राखाडी, चॉकलेटी, जांभळा असे विविध रंगांचे कॉन्टॅक्ट लेन्सेस उपलब्ध होऊ शकतात. या लेंसेसमध्ये बराच काळ टिकणाऱया तसेच डिस्पोजेबल म्हणजेच वापरून फेकून देण्यासारख्या लेंसेस उपलब्ध आहेत. मेकअप काढतानाही प्रथम लेन्स काढून त्या व्यवस्थित ठेवून मग मेकअप काढण्यास घ्यावा.
जेल लाइनर – हे क्रीम लाइनरसारखच असतं, पण थोडंसं घट्ट असतं. जेल लाइनर ब्लेंड आणि स्मज करता येतं. जेल लाइनर ग्राफिक आणि बोल्ड लाईन काढण्यास उत्तम आहे. स्मोकी आयसाठी हे लायनर उत्तम आहे.
लिक्विड लाइनर – रोमँटिक लुक, कॅटआय, अरेबिक लुक तसेच पापण्या ठळक दिसण्यासाठी लिक्विड लाइनरचा वापर करतात. लिक्विड लाइनर लावण्यास थोडेसे अवघड असून ते लावताना हातावर पकड महत्त्वाची असते, मात्र लिक्विड लाइनरनी बारीक तंतोतंत आकार देता येतो.
क्रीम लाइनर – खास करून मेकअप आर्टिस्ट याचा वापर जास्त करतात, मात्र अलीकडे क्रीम लाइनरी सर्रास वापरले जाते, हे डबीमध्ये मिळते. अँगल ब्रशनी किंवा फाईन टीप ब्रशने याला वापरतात. स्मजी लुक, प्रॉपर ग्राफिक लाईन काढण्यासाठी क्रीम लाइनर उपयुक्त आहे, हे क्रिमी स्वरूपात असल्यामुळे लवकर स्मज होते. ब्लेंड करण्यास सोपे जाते.
साधं काजळ घातलं तरी डोळय़ांचे सौंदर्य खुलतं आणि त्याबरोबरच मस्कारा आयशाडो आय लाइनर्स वापर झाला, तर मग डोळे आपल्या पर्सनॅलिटीला चार चांद लावतात.
डोळय़ांच्या मेकअपमध्ये विविध आकारालादेखील महत्त्व आहे. डोळय़ांच्या आकारातील आपल्याला पाहिजे तसा बदल आपण करू शकतो. अशाच प्रकारे डोळय़ांचे वेगवेगळे शेप आपण तयार करू शकतो.
फॅन शेप – यामध्ये पापण्यांचे तीन भागांत विभाजन केले जाते. एकाच रंगाच्या तीन शेड्स यासाठी वापरल्या जातात. फिकट, मध्यम आणि गडद असा क्रम ठेवून फ्लॅट टीप ब्रशचा वापर करता येतो.
कॅट आय – हा लुक देण्यासाठी आयशाडो व जेल आय लाइनरचा वापर करावा. सॉफ्ट लुकसाठी आयशाडो वापरावा, तर नॉर्मलसाठी आय लाइनर वापरावं.
स्मोकी आय – सध्या स्मोकी हा प्रकार जास्त लोकप्रिय आहे. फॅशन शोमध्ये तसेच ब्रायडलला संध्याकाळच्या गाऊनवर अशा प्रकारचा स्मोकिआय लुक देता येतो. स्मोकी आय करताना पेन्सिल लाइनरचा वापर करावा.
स्नो ग्लोब – हा साधारण फॅनशेप सारखाच असतो. स्नो ग्लोव शेपने डोळे गोलाकार असल्याचा आभास होतो. या प्रकारात आयशाडो लावताना डोळय़ांच्या आतील आणि बाहेरील भागास गडद शेड आणि मधल्या भागाला फिकट रंग वापरावा.
कट क्रिस – हा आयशाडोचा प्रकार करताना प्रथम आयलाईनर पेन्सिलने क्रीज लाईन काढून घ्यावी. ज्या भागावर पापणी आत जाते व भुवईचे हाड लागते तिथे ही ठळक रेषा काढावी आणि ती थोडी वरच्या दिशेने ब्लेंड करावी.





























































