शिवभोजन थाळी ठरतेय गोरगरीबांचा आधार;संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागच्या येळी लाकडाऊन लागल तवा पोटाला चिमटा देऊन राहण्याची वेळ आली व्हती. तवा बी या  शिवभोजनानच आमाला जगिवलं. आता बी कसं व्हईल असं वाटत व्हतं पण शिवभोजन आलं… आमच्या पोटाची सोय झाली… सरकारचं भलं व्हईल… शिवभोजन थाळीने तृप्त झालेल्या गोरगरिबांनी असा पोटातून आशीर्वाद दिला. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या कडक संचारबंदीत राज्यातील गोरगरीबांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार झाला असून संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी शिवभोजन केंद्रासमोर रांगा लागल्या.

महाविकास आघाडीच्या सरकारने गरीबांना स्वस्तात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रुपयांत थाळी देण्याची ही योजना सुरू केली. मागील लॉकडाऊनच्या काळात ती पाच रुपयांना उपलब्ध करण्यात आली. आता ही थाळी मोफत केली आहे.

संचारबंदी लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी राज्यातील ठिकठिकाणच्या शिवभोजन केंद्रांसमोर गोरगरीबांनी रांगा लावल्या. कोरोनाचे नियम पाळून गरजूंना थाळय़ांचे वाटप करण्यात आले. शिवभोजन हातात येताच भुकेल्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले. संचारबंदीत आमचे कसे होणार, निदान दोन घास तरी मिळतील की नाही याची चिंता होती. परंतु शिवभोजनाने आम्हाला तृप्त केले, अशी उत्स्फूर्त
प्रतिक्रिया या गोरगरीबांच्या मुखातून बाहेर पडली.

आज पहिल्याच दिवशी नगर जिह्यातील सर्व केंद्रांवर या थाळीला उत्तम प्रतिसाद मिळाला. जिह्यात 29 केंद्रांवरून थाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्यांची क्षमता साडेतीन हजार थाळी प्रतिदिन आहे. आज बहुतांश केंद्रांवरील थाळ्या दुपारी संपल्या. त्यामुळे आणखी 800 थाळ्या वाढवून देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे.

संभाजीनगरात गांधीनगर भागातील शिवभोजन केंद्रावर संचारबंदीच्या पहिल्या दिवशी 200 थाळय़ांचे वाटप झाले. गुढी पाडव्याच्या दिवशी लोढा यांनी पुरीभाजी, मसालेभात, भजे, श्रीखंड असा शाही बेत केला होता. रेल्वे स्थानक भागातील केंद्राने मागच्या लॉकडाऊनमध्ये घराकडे परतणाऱया परराज्यातील मजुरांची भूक भागवली होती.