महागाईच्या विरोधात रत्नागिरीत शिवसेनेचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवून महागाईच्या खाईत लोटणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात रविवारी रत्नागिरीत शिवसेना आणि युवासेनेने जोरदार आंदोलन केले. घोडा, बैलगाडी या वाहतुकीच्या पारंपरिक साधनाचा रॅलीत वापर करताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सायकलस्वारी करत पेट्रोल-डिजेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले.

मारूती मंदिर येथून महागाई विरोधातील मोर्चाला रविवारी सकाळी सुरूवात झाली.दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल-डिजेलचे दर,सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले दर यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. दररोज भडकणाऱ्या महागाईच्या आगडोंबात सामान्य माणूस होरपळत आहे. २०१४ साली महागाई कमी करून अच्छे दिन आणू असे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या केंद्रातील भाजप सरकारने दिवसेंदिवस महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसली. वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेने मोर्चा काढला.या मोर्चात बैलगाड्या,घोडे आणि सायकल घेऊन शिवसैनिक सहभागी झाले होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, विधानसभा मतदारसंघ क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे आदींसह शिवसैनिक मोर्चात उपस्थित होते. मोर्चात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत जयस्तंभपर्यंत रॅली काढण्यात आली.