
सामना प्रतिनिधी । कर्जत
”शिवसेना झिंदाबाद”, ”कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला”, ”छत्रपती शिवाजी महाराज की जय”, ”हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, विजय असो” अशा घोषणा देत आज शिवसेनेच्या बारा उमेदवारांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांने आज आपले उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दाखल केले. कर्जत नगरपालिकेची निवडणूक येत्या २७ जानेवारी रोजी होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ९ जानेवारी ही शेवटची तारीख असल्याने शिवसेनेने मंगळवारचा मुहूर्त साधला. शिवसेना आणि आरपीआयच्या बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत आरपीआय कर्जतमध्ये शिवसेनेच्या सोबत आहे.
दुपारी बारा वाजता कर्जतचे ग्राम दैवत धापया देवस्थानमध्ये सर्व उमेदवारांनी दर्शन घेऊन रॅलीला सुरूवात केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून पुढे ही रॅली नागरपालिकेकडे गेली. यावेळी सर्व कर्जत शहरात भगवे वादळ निर्माण झाले होते. संपूर्ण कर्जत शहरातून काढलेल्या या रॅलीमध्ये सर्वात जास्त महिलांचे प्रमाण होते.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख दत्ता दळवी, शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, विधानसभा संघटक संतोष भोईर, विजय पाटील, तालुका प्रमुख संभाजी जगताप, तालुका संघटक राजेश जाधव, युवासेना जिल्हा अधिकारी मयूर जोशी, महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे,भाई गायकर, नेरळ शहर प्रमुख रोहिदास मोरे, माजी सभापती अमर मिसाळ, प्रदीप ठाकरे, बालाजी विचारे, शहर प्रमुख भालचंद्र जोशी, आरपीआयचे शहर अध्यक्ष अरविंद मोरे, राहुल डाळिंबकर इत्यादी यावेळी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस असून आता पर्यंत नगरसेवक पदासाठी २० अर्ज आणि नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. एकूण २१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर राष्ट्रवादी आणि भाजप उद्या आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.



























































