
शिवसेना ही वस्तू नाही की कुणी चोरून नेऊ शकेल आणि धनुष्यबाणही शिवसेनेचाच आहे, तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिंदे गटाला ठणकावले. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाविषयी चर्चा केली जात आहे, पण कायद्याच्या दृष्टीने बघितले आणि घटनेत जे काही नमूद आहे त्यानुसार धनुष्यबाण हा आपलाच आहे, त्यामुळे ती चिंता सोडा, असा ठाम विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. जे काही घडलेय ते महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही असे सांगतानाच, असे खेळ खेळण्यापेक्षा विधानसभा निवडणुका घ्या, असे आव्हानही पुन्हा एकदा त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत वारंवार उपस्थित केल्या जाणाऱया शंकांवर सडेतोड शब्दांत उत्तरे दिली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मतदान पत्रिकेवरील चिन्ह महत्त्वाचे असते. तो आपला धनुष्यबाण आहे. पण नुसत्या धनुष्यबाणाचा लोक विचार करत नाहीत तर तो हाती घेतलेल्या माणसाची ‘चिन्हे’ बरोबर आहेत की नाहीत हेसुद्धा बघतात. हेच मी शिवसैनिकांना पटवून दिले. याचा अर्थ नवीन चिन्हाचा विचार करतोय, असे बिलकूल नाही.’
शिवसेना ही वस्तू नाही की कुणी चोरून नेईल
‘शिवसेना कोणाची, हा मुद्दा उपस्थित केला जातोय. शिवसेना ही एखादी वस्तू नाही की ती घेऊन कुणी पळत सुटेल! कुणी चोरून नेऊ शकेल अशी शिवसेना नाही,’ असे ठणकावतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ पक्ष आणि रस्त्यावरचा पक्ष या मुद्दय़ावरही भाष्य केले. ते म्हणाले की, ‘रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय्यहक्कासाठी रस्त्यावर उतरत असतो. जनता त्याला आशीर्वाद देत असते. मग त्या पक्षाच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, नगर पंचायती, महापालिका, विधानसभा, लोकसभेत जात असतात.’
हिमतीची साधी माणसे सोबत आहेत तोपर्यंत शिवसेनेला कुणी धोका पोहोचवू शकत नाही!
ठाणे, नवी मुंबईतील नगरसेवक शिवसेना सोडून गेले असे फोटो येत आहेत. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी, ‘आता महानगरपालिकाच अस्तित्वात नसल्याने जे गेले असतील ते त्यांचे वैयक्तिक कार्यकर्ते असतील,’ असा टोला लगावला. निष्ठावान शिवसैनिकांच्या शिफारशीवरून ज्यांना उमेदवारी दिली गेली होती असे लोक गेले असतील, असेही ते म्हणाले. ‘तळहातावर पोट असलेले साधेसुधे शिवसैनिक शिवसेना भवनात येत आहेत. महिला वाघिणी येत आहेत. आजही ती मोठय़ा हिमतीची माणसे शिवसेनेसोबत आहेत आणि ती आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला कुणी धोका पोहोचवू शकत नाही.’ असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.
माझ्या कुटुंबीयांवर टीका होत असताना कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती
‘मातोश्री’ने सन्मानाने बोलवले आणि भाजपशी बोलणी केली तर पुन्हा येऊ, असे म्हणणाऱया बंडखोर आमदारांचाही समाचार यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला. सुरतेला जाण्यापेक्षा इथेच सूरत (चेहरा) दाखवून बोलला असतात तर अधिक बरे झाले असते, असा टोला त्यांनी बंडखोरांना लगावला. तिकडे गेल्यानंतरही तुम्हाला ‘मातोश्री’, उद्धव ठाकरे आणि आणि आदित्यबद्दल प्रेम आहे हे ऐकून खरंच धन्य झालो, असे ते म्हणाले. गेली अडीच वर्षे ‘मातोश्री’वर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर अश्लाघ्य आणि विकृत भाषेत टीका होत होती त्यावेळी या बंडखोरांपैकी एकाचीही दातखीळ उचकटली नव्हती, एकानेही टीकेला विरोध केला नव्हता, असा संतापही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ज्यांनी ठाकरे कुटुंबाचा अपमान केला, माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांचे प्रयत्न सुरू होते अशा लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसत आहात, मग हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला कळलेच पाहिजे, असे ते म्हणाले.
राष्ट्रपती निवडणुकीबाबत खासदारांशी बोलून निर्णय घेईन
राष्ट्रपती निवडणुकीबाबत माझ्या खासदारांशी आणि नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेईन, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केलीत?
भाजपने घात केल्याने आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला. आज जे काही त्यांनी घडवलेले आहे ते अडीच वर्षांपूर्वी केले असते तर ते सन्मानाने झाले असते. जे खर्चाचे तीन हजार कोटींचे आकडे येताहेत, ते फुकटात झाले असते. जी गोष्टी सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केलीत? जी गोष्ट दिलदारपणे झाली असती ती एवढा खर्च करून का केलीत? असा घणाघातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.
मी पंढरपूरला जाईन, विठूरायाचे दर्शन घेईन
एक-दोन दिवसांवर आषाढी एकादशी आलेली आहे. लाखो भाविक विठूमाऊलीचा गजर करीत पंढरीला पोहोचत आहेत. मला वारकऱयांचे निमंत्रण आले आहे की, साहेब आपणही दर्शनासाठी या. मी नक्कीच जाणार आहे, पण या सर्व गदारोळात जाणार नाही. नंतर पंढरपूरला जाईन. विठूरायाचे दर्शन घेईन, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचा विजय निश्चितच आहे
शिवसेनेसोबत कायम असलेल्या कैलास पाटील, नितीन देशमुख व अन्य आमदारांचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. दडपणे आली, आमिषे दाखवली गेली, धमक्या दिल्या गेल्या तरीही मागे हटणार नाही अशी जिगर दाखवणारी ही माणसे जिथे असतात तिथे विजय हा निश्चित असतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सगळय़ांनाच आमिष देऊन, दमदाटय़ा करून तुम्ही नेऊ शकत नाही!
विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि नोंदणीकृत पक्ष हा वेगळा असतो. ज्यात असंख्य मतदार, नागरिक, सदस्य आले, पदाधिकारी आले. त्या पदाधिकाऱयांना असेच उचलून कोणी घेऊन जाऊ शकत नाही, असे सांगतानाच सगळय़ांनाच आमिष देऊन, दमदाटय़ा करून तुम्ही नेऊ शकत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला बजावले.
शिवसैनिकांवरील दडपण कमी करणे हे माझे काम
‘मातोश्री’वर गेल्या 10 ते 15 दिवसांपासून शिवसैनिक तसेच जनतेची रीघ लागली आहे. सैनिकांचे सामान्य जनतेचे लोंढेच्या लोंढे येत असून त्यांच्याशी बोलतोय. सगळय़ांच्या डोळय़ांत अश्रू आहेत, भावना दाटून आल्या आहेत. शिवसेनाप्रमुखांना एकदा विचारण्यात आले की तुम्हाला ही परिस्थिती बघून वाईट वाटते की नाही वाटत. ते म्हणाले होते की, माशाच्या डोळय़ातले अश्रू कधी कोणाला दिसत नसतात. त्यांचे हे वाक्य कायम लक्षात ठेवण्यासारखे आहे. भावना मलाही आहेत, वाईट मलाही वाटलेले आहे. म्हणून मी बोलताना माझ्या सैनिकांवर दडपण वाढेल असे बोलत राहिलो तर ते योग्य ठरणार नाही. मुळात दडपण येण्याची शक्यताच नाही, ते दडपण हलके करणे, ते दडपण नाही हे सांगणे माझे काम आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
11 जुलैचा निकाल लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा आहे
‘आजही देशामध्ये असत्यमेव जयते हे वाक्य नाही तर सत्यमेव जयते हेच वाक्य आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. येत्या 11 तारखेला जो निकाल लागेल तो लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा आहे.’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. देशात लोकशाहीचे अस्तित्व, लोकशाहीचे भविष्य किती काळ टिकणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेनुसार आपल्या देशाचा कारभार यापुढे होणार आहे की नाही हे ठरवणारा आणि देशाच्या वाटचालीला दिशा दाखवणारा तो निकाल असेल, असे ते म्हणाले.
आमदार गेले म्हणून पक्ष संपत नसतो
एक आमदार असो, पन्नास असोत किंवा शंभर असतो, हे सगळेच्या सगळे जरी सोडून गेले तरी पक्ष अस्तित्वात असतो. आमदार गेले म्हणून पक्ष संपू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. यासंदर्भात लोकांच्या मनात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असून या भ्रमाच्या भोपळय़ात अजिबात अडकू नका, असे त्यांनी शिवसैनिकांना सांगितले.
फटकारे
इतके दिवस जे गप्प होते ते आता तिथे जाऊन बोलू लागले आहेत. मातोश्रीने सन्मानाने बोलावलं आणि भाजपशी बोलणी केली तर येऊ असं म्हणत आहेत. मी यापूर्वीही त्यांना सुरतेला जाण्यापेक्षा सूरत (चेहरा) दाखवून इथेच बोलला असता तर अधिक बरं झालं असतं असं म्हटलं होतं. ते पर्यटन करण्याची काही गरज नव्हती.
ज्यांनी ठाकरे कुटुंबाचा अपमान केला, माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते. अशा लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसत आहात, त्यांच्याकडून स्वागत स्वीकारत आहात, मग हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला कळू द्या.
या लोकांना मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्यबद्दल प्रेम आहे याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानत आहे. आजदेखील तिकडे गेल्यानंतरही आमच्याबद्दल प्रेम वाटत आहे याबद्दल धन्य झालो, पण गेली अडीच वर्षे याच घरावर, कुटुंबीयांवर अश्लाघ्य आणि विकृत भाषेत टीका केली जात होती तेव्हा या बंडखोरांपैकी एकाचीही दातखीळ उचकटली नव्हती.




























































