रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर करा, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्याला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. गेल्या महिनाभरापासून जोरदार बसरणाऱया पावसामुळे काढणीला आलेली भातपिके अक्षरशः सडली असल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मासेमारी ठप्प आहे. तसेच बदललेल्या या हवामानाचा मोठा फटका आंबा आणि काजूला बसणार आहे. त्यामुळे दोन्ही जिह्यांत नैसर्गिक आपत्ती जाहीर करून आर्थिक नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेने राज्यपालांकडे केली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात भात पीक घेतले जाते. त्यानुसार शेतकऱयांनी लावणी केलेली भातपिके काढणीला आली आहेत, मात्र पाऊसच थांबण्याचे नाव घेईना. त्यातच नुकत्याच आलेल्या ‘क्यार’ वादळामुळे मोठा पाऊस झाला असून पुढील 24 तासांत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच जिह्यातील आपत्तीबाबतही चर्चा करून झालेले नुकसान त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार उदय सामंत, रमेश कोरगावकर, सदानंद चव्हाण, माजी महापौर दत्ता दळवी, सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, नगरसेवक अनंत (बाळा) नर, माजी नगरसेवक शैलेश परब आदी उपस्थित होते.

पर्यटनालाही फटका
रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील निसर्ग आणि निळाशार समुद्रकिनारा पाहण्यासाठी देशविदेशातून येथे पर्यटक येतात. त्यामुळे नेहमी येथील किनारे पर्यटकांनी फुललेले असायचे. पण सातत्याने कोसळणाऱया धुवांधार पावसामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली असून हॉटेलची बुकिंग रद्द करण्यात आली असल्यामुळे आधीच मंदीचा सामना करणाऱया पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.