मुंबईवर टीका करणाऱ्यांनी आधी नागपूर सुधारावे- अनिल परब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महेश उपदेव, नागपूर

उठसूठ मुंबईच्या पायाभूत सुविधांवर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी आधी नागपूर सुधारावे, असा सल्ला शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दिला आहे. मुसळधार पावसाने नागपुरातील विधिमंडळाचे कामकाज स्थगित करावे लागले. नागपुरातील रस्त्यांवर पाणी साचले. वाहतूक विस्कळीत झाली. विधानभवनातील वीज पुरवठा खंडीत करावा लागला. तसेच मंत्र्यांच्या कॉटेजमध्येही पाणी घुसले. केवळ एक दिवसाच्या पावसाने नागपूरच्या पायाभूत सुविधांचा फज्जा उडाला आहे. यावर शिवसेनेच्या आमदारांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे.

शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपच्या नेत्यांना नागपूर सुधारण्याचा सल्ला दिला. मुंबईत पाऊस आल्यानंतर तेथे होणाऱ्या अवस्थेवर एका क्षणाचाही विलंब न लावता शिवसेनेने मुंबई बकाल केली, असे पालूपद लावले जाते. नागपूर हे स्मार्ट सिटी आहे, असा आव आणला जातो. परंतु एक दिवसाच्या पावसाने नागपूरचा विकासाचा चेहरा उघडा पडला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर नागपूरच्या नागनदीत बोट चालविण्याचे स्वप्न नागपूरकरांना दाखविले होते. या पावसाने गडकरींचे हे स्वप्न पूर्ण होईल, असे उपहासात्मक टीका त्यांनी केली.

पावसाळ्यात मुंबई तुंबते म्हणून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा हट्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. परंतु कोणतेही नियोजन प्रशासनाने केले नव्हते. महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, मेट्रो, स्मार्ट सिटी यापैकी कुणाची जबाबदारी हे आता निश्‍चित करण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात मुंबईत पाणी साचल्यानंतर मुंबई महापालिकेवर टीका करण्याचा भाजपच्या नेत्यांचा आवडता छंद आहे. शिवसेनेने पायाभूत सुविधा केल्या नाहीत, असा आरोप केला जातो. परंतु आता नागपुरातील पायाभूत सुविधांची जबाबदारी कुणाची, याचे उत्तर आता राज्यातील १२ कोटी जनतेला देण्याची गरज असल्याचे परब यांनी सांगितले.