
सामना प्रतिनिधी । मालवण
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री व सत्ताधारी आमदार यांच्या उपस्थितीत विकासकामांबाबत बैठका होतात. त्यामुळे या बैठका उधळून लावण्याची भाषा वापरणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी बैठका उधळून दाखवाव्यातच, असे प्रतिआव्हान आमदार वैभव नाईक यांनी त्यांना दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा पालकमंत्री व आमदारांकडून दुरुपयोग होत आहे, असा आरोप करीत आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थित होणाऱ्या बैठका उधळून लावल्या जातील, या इशाऱ्याला आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नाईक बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती पंकज सादये, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, यशवंत गावकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
मच्छीमारांचा आमदार वैभव नाईक यांच्यावर विश्वास आहे. हक्काने आपल्या आमदारकडे येऊन शासनदरबारी पाठपुरावा करून समस्या मार्गी लावतात. आमदार म्हणून मच्छीमारांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवतो. मच्छीमारांच्या नावाने राजकारण करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना स्वाभिमान पदाधिकाऱ्यांच्याच पर्ससीन नौका आहेत, हे नव्याने सांगण्याची गरज नाही, असा उपरोधिक टोलाही आमदार नाईक यांनी लगावला.
दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. मच्छीमाराना सोबत असल्याचे भासवून इशाऱ्यांवर इशारे देतात आणि मुंबईला जाऊन बसतात, अशी टीका करताना आम्ही मच्छीमाराना विश्वासात घेऊन त्यांचे प्रामाणिकपणे प्रश्न सोडवतो. शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना खावटी कर्ज माफ होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. याबाबत कृषीमंत्री सकारात्मक असून लवकरच शासन निर्णय होईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.
विधानभवनात पर्ससीन मासेमारी, प्रकाशझोतातील मासेमारीवर वारंवार आवाज उठविल्याने शासनाने पर्ससीनवर निर्बंध व एलईडी मासेमारीवर बंदी आणली. त्यामुळे राज्याचे मत्स्योत्पादन वाढले. गोवा राज्यात सिंधुदुर्गातील मासळीवर बंदी घालण्यात आल्यानंतर आम्ही मच्छीमारांच्या पाठीशी राहून त्यांच्यावर आलेल्या नव्या संकटावर मार्ग काढला. मच्छीमारांना शासनाकडून मिळणारा डिझेल परतावाही मीच मिळवून दिला. त्यामुळे आमदार नीतेश राणें यांना निवडणुकीच्या तोंडावर मच्छीमारांची आठवण झाली आहे. मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असा टोला आमदार नाईक यांनी लगावला.
आमदार राणे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कणकवली शहरासाठी जादा दर वाढवून दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र राणेंनी कणकवलीवासीयांचा भ्रमनिरास केला. चौपदरीकरणात बाधित झालेल्यांना एक रुपयाही मिळाला नाही. ठेकेदाराकडून सुरू असलेले काम कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, हे कणकवलीवासीयांना माहीत आहे. त्यामुळे आमदार राणेंनी कणकवलीकराना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, असा टोला आमदार नाईक यांनी हाणला.
महाराणा प्रताप कलादालनाला जिल्हा नियोजनमधून पालकमंत्र्यांनी ५४ लाखाचा निधी मंजूर करून दिला. मात्र पालकमंत्र्यांना उदघाटनाला सुद्धा बोलावले गेले नाही. त्यांचा निधी मात्र चालतो असाही टोला नाईक यांनी लगावला.




























































