
बेळगावातील सीमाबांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून रोखठोक भूमिका मांडणारे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना बुधवारी बेळगाव न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ‘बेळगाव लाईव्ह’च्या कार्यक्रमात त्यांनी भाषण केले होते. त्याद्वारे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात जामीन मंजूर झाल्यामुळे संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
30 मार्च 2018 रोजी ‘बेळगाव लाईव्ह’चा वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले शिवसेना नेते–खासदार संजय राऊत यांनी सीमाबांधवांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका मांडली होती. तथापि, त्या भाषणावर आक्षेप घेत बेळगावातील टिळक वाडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्यासह तिघांविरुद्ध दोन भाषिक गटांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्यात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करीत संजय राऊत यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील शामसुंदर पत्तार, मारुती कामानाचे, शंकर बाळनाईक आणि हेमराज बेंचन्नवर यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. त्याची गंभीर दखल घेत प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांनी संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करीत मोठा दिलासा दिला आहे.
























































