
सामना ऑनलाईन, परभणी
यंदाचा दुष्काळ महाभयंकर आहे. शेतशिवारात भयाण शुकशुकाट पसरला असून स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. कर्जमाफी व पीकविमा या योजना फसव्या ठरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता शिवसेना संपूर्ण कर्जमुक्ती व पीकविम्याच्या लाभासाठी एल्गार करणार असल्याची घोषणा शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी परभणी येथे केली.
पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे जय भवानी महिला सूतगिरणीचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर त्याच ठिकाणी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दुष्काळ निवारण शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण मराठवाडय़ात आल्याचे सांगितले. सर्वत्र भयाण वातावरण असून शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांना तर पारावार उरला नाही. दुष्काळाने शेतकऱ्यांची अन्नान्नदशा केली आहे. जनावरांचे चारापाण्यासाठी हाल होत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर होत आहे, पण उद्योगधंद्यांचेही तेच हाल आहेत.
पीकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. पीकविम्याचा घोटाळा हा राफेलपेक्षाही मोठा असल्याचे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी म्हटले आहे. कर्जमाफीचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला पण शेतकऱ्यांच्या पदरी खडकूही पडला नाही. सरकार कर्जमाफी केली असे म्हणते. माफी ही गुन्हेगारांना देतात. शेतकऱ्यांनी असा कोणता गुन्हा केला आहे, असा रोखठोक सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. माझी कर्जमुक्ती झाली असे छातीठोक सांगणारा एकही शेतकरी मला भेटला नाही असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला. सरकारला आंदोलनाचीच भाषा कळत असेल तर शिवसेना कर्जमुक्ती व पीकविम्यासाठी लवकरच एल्गार करेल अशी घोषणा यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहून दुःख होते. तुम्हाला कितीही अडचण आली असेल तर आमची आठवण काढा. शिवसेना मदत करेल. स्वतःचे बरेवाईट करू नका. त्यावर मात करून पुढे जाऊ. स्त्री, वृद्ध, बालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी अशा समाजातील कोणीही आत्महत्येच्या मार्गाला जाऊ नका असे कळकळीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी व्यासपीठावर स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
































































