कवठे येमाईच्या ग्रामपंचायतीत अखेर भगवा फडकला, सरपंच पदी शिवसेनेचे अरुण मुंजाळ यांची निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूर तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत मोठ्या असलेल्या ग्रामपंचायतीत गेल्या ४ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. वर्षाला एकाला सरपंच पदाची संधी मिळावी या धोरणातून सरपंच निवडणूक होत होती. तर नुकताच सरपंच दीपक रत्नपारखी यांनी राजीनामा दिल्याने आज बुधवार दि. २० ला सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. १७ सदस्य असलेल्या कवठे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीतील सुरेश रोहिले, अरुण मुंजाळ हे सरपंच पदासाठी प्रबळ दावेदार होते. पण सरपंच पदासाठी दोघात मोठीच रस्सीखेच सुरु झाल्याने अरुण मुंजाळ यांनी शिवसेनेचे शिरूर पं. स. सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांच्याशी जवळीक साधली.

सरपंच निवडणूक दरम्यान रोहिले व मुंजाळ यांना प्रत्येकी आठ आठ अशी समान मते मिळाल्याने लहान मुलीच्या हाताने काढलेल्या ईश्वरी चिठ्ठीत अरुण मुंजाळ विजयी झाले व कवठे ग्रामपंचायतीत सत्ता पालट होऊन शिवसेनेचा भगवा फडकला. याबाबत शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजी राव आढळराव पाटील यांनी डॉ. सुभाष पोकळे व नवनिर्वाचित सरपंच अरुण मुंजाळ यांचे अभिनंदन करीत सर्व ग्रामस्थांचेही अभिनंदन केले आहे.

तर शिरूर पंचायत समितीतील शिवसेनेचे एकमेव सदस्य असलेले कवठे गावचे डॉ.सुभाष पोकळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का देत शिवसेनेचे अरुण मुंजाळ यांना विजयश्री मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत पुन्हा एकदा कवठे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण केले आहे. तर नव्याने निवडून आलेले सरपंच अरुण मुंजाळ यांनी आगामी काळात सर्वांना सोबत घेत गावच्या सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने कार्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी शिरूरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके, उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक शांततेत पार पडल्याने पोलीस निरीक्षक घोडके यांनी समाधान व्यक्त केले आहे.