रेल कामगार सेनेच्या ऐतिहासिक विजयाचे उद्धव ठाकरेंकडून कौतुक, भायखळा, परळ इन्स्टिटय़ूटमधील विजयी उमेदवारांनी घेतली भेट

मध्य रेल्वेच्या भायखळा आणि परळ मेपॅनिकल इन्स्टिटय़ूटमध्ये रेल कामगार सेनेने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विजयी उमेदवारांचे भरभरून कौतुक केले. रेल कामगार सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अथक परिश्रम, सत्य, शिस्त, संघभावना आणि सर्वांच्या संघटित मेहनतीचे फलित म्हणजे हा ऐतिहासिक विजय आहे, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. कामगारांच्या न्यायासाठी, कल्याणासाठी काम करीत रहा, पक्ष नेहमी संघटनेच्या आणि कामगारांच्या पाठीशी असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

रेल कामगार सेनेच्या विजयी उमेदवारांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत, उपनेत्या किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते. रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या सहकार्याने व सरचिटणीस दिवाकर देव (बाबी) यांच्या नेतृत्वाखाली सर्व विजयी उमेदवारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मध्य रेल्वे मुंबई विभागातील इन्स्टिटय़ूट निवडणुकीत रेल कामगार सेनेने भायखळ्यात स्वतंत्र तर परळमध्ये मनसे आणि सीआरएमएस, ओबीसी संघटनांना सोबत घेऊन दणदणीत विजय मिळवला आहे.