
>> बाबासाहेब गायकवाड
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे विजयी झाले. त्यानंतर एकच महिन्यात झालेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून त्यांचे बंधू शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी दणदणीत विजय संपादन केला. शिवसेनेच्या डबल धमाक्याने काँग्रेस, राष्ट्रवादीची हौस फिटली. सत्ता-मत्तेच्या जोरावरील साम, दाम, दंड, भेद या भाजप नीतीच्या पुरत्या चिंधडय़ा उडाल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचीच भगवी लाट आहे, हे या दुहेरी विजयाने अधोरेखित झाले आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही ही लाट अशीच तेजस्वी राहील. इतरांपेक्षा वेगळे समजणाऱया भाजपासारख्या शहाण्या पक्षाला आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला हा इशारा पुरेसा आहे.
केंद्र, राज्यात आणि नाशिक महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपाला विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्वपक्षाचा उमेदवार रिंगणात उतरविण्याची हिम्मत झाली नाही. केवळ शिवसेनेला अपशकून करायचा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आदेशाने ऐनवेळी भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादीशी अभद्र युती केली. सगळे प्रयोग करूनही शिवसेनेचे नरेंद्र दराडे हेच विजयी झाले. या निवडणुकीत भाजपाने स्वतःचे तोंड स्वतःच झोडून घेतले.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातही भाजपाची अवस्था त्या निवडणुकीसारखीच होती. शिक्षक मतदारसंघात नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार हे पाच जिल्हे येतात. एवढय़ा मोठय़ा मतदारसंघात विजयाची खात्री असणारा प्रभावशाली उमेदवार त्यांच्याकडे नव्हताच. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवार देता आला नाही. या निवडणुकीत उमेदवार द्यायचा अन् ताकद अजमावयाचीच, असा चंग या पक्षाने बांधला. ज्यांची अख्खी हयात काँग्रेसमध्ये गेली, ते काँग्रेसचे माजी मंत्री विजय नवल पाटील यांना भाजपेयींनी पटविले. त्यांचे पुत्र अनिकेत पाटील यांना घोडय़ावर बसवून भाजपात घाईघाईत प्रवेश देवून शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी त्यांच्या गळ्यात मारली. हे उसने अवसान घेवून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीष महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे सर्वच पाच जिह्यात फिरले. शिक्षकांच्या मेळाव्यांमधून विकास आणि त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या गप्पा झोडल्या. ओल्या, सुक्या पाटर्य़ांमधून साम, दाम, दंड, भेदाच्या नीतीचा अवलंब केला. तरीही जे व्हायचे तेच झाले. अनिकेत पाटील निकालाच्या पहिल्या फेरीत चौथ्या आणि नंतर अखेरच्या फेरीपर्यंत तिसऱया क्रमांकावर राहिले, ४९ हजार ७८४ पैकी त्यांना अवघी ६ हजार ३२९ मते मिळाली. प्रचार काळात गप्पा झोडणारे भाजपाचे नेते, मंत्री पाटलांप्रती साधी सहानुभूती दाखविण्यासाठीसुद्धा मतमोजणी केंद्रावर फिरकले नाहीत. त्यांना पळताभुई थोडी झाली, उसनं अवसान पुरतं गळून पडलं.
एक वर्ष आधीपासून कामाला लागलेले संदीप बेडसे काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेवून रिंगणात उतरले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, अमरिशभाई पटेल अशी दिग्गजांची फौज त्यांच्या पाठिशी होती, असा त्यांचा सुरुवातीपासूनचा दावा होता. बेडसेंनीही जमेल तशा भेटीगाठी घेतल्या, मेळावे घेतले. शिवसेनेचे किशोर दराडे यांच्यावर आरोप करण्याची नस्ती उठाठेवही केली. त्यांनाही अवघ्या १३ हजार ८३० मतांवर समाधान मानून दारूण पराभव पत्करावा लागला.
भक्कम साथ आणि उत्तम नियोजन
आमदार दराडे बंधू येवल्यातील पहिलवान. कुस्तीप्रमाणेच त्यांनी राजकारणाच्या आखाडय़ात शिवसेनेच्या साथीने डाव टाकले आणि यश खेचून आणले. नरेंद्र दराडे हे आमदार झाल्यानंतर लगेचच शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून किशोर दराडे रिंगणात उतरले. शिवसेनेच्या बळावर विजयाचा डबल धमाका उडवणारच, असाच त्यांचा आत्मविश्वास होता. नाशिक विभागातील शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याशी योग्य समन्वय ठेवून त्यांनी सूक्ष्म नियोजन केले. स्वतःच्या शैक्षणिक संस्थेतील शिक्षक व कर्मचारी, अन्य सर्व हितचिंतक यांना कामाला लावून ते स्वतः पाच जिह्यातील ५७ तालुक्यातील प्रत्येक शिक्षक मतदारापर्यंत पोहचले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाने, राज्यमंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, संजय सावंत, विलास पारकर, के. पी. नाईक, बबन थोरात, भाऊ कोरगावकर, आमदार सुनील शिंदे यांच्यासह सर्व जिल्हाप्रमुख, आमदार, खासदार, आजी-माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक अशी सर्वांचीच किशोर दराडे यांना भक्कम साथ मिळाली. तब्बल २४ हजार ३६९ मते घेवून ते विजयी झाले. या पहिलवानाने यशस्वी डाव टाकून भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधकांना चारीमुंडय़ा चित केले. निवडणुकीच्या आखाडय़ातून पळताभुई थोडी झालेल्या भाजपाच्या साम, दाम, दंड, भेद नीतीच्या दुसऱयांदा चिंधडय़ा उडाल्या आहेत. शिवसेनेच्या स्वबळाची ही भगवी लाट आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आणखी तेजस्वी होईल. महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता येण्याची ही नांदी ठरेल.

























































