
जे आमदार इकडून तिकडे गेले. त्यांच्या हाताला, मानेला पकडून फरफटत नेले. यामागे जे पुन्हा येईन, पुन्हा येईन बोलतात ते आहेत काय, असा सवाल युवासेनाप्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. या षडयंत्रामागे कोणीही असलं तरी महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. त्यांच्यासमोर झुकणार नाही, थोडीतरी लाजलज्जा, शरम असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. या बंडखोरांना पाडले नाही तर आदित्य ठाकरे नाव लावणार नाही, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.
कर्जत येथे कर्जत-खालापूरमधील शिवसैनिकांचा दणदणीत मेळावा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत रॉयल गार्डन येथे झाला. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, मी जिथे जातो तिथे प्रत्येक शिवसैनिक या परिस्थितीकडे संकट म्हणून नाही तर संधी म्हणून पाहतोय. पावसाळय़ापूर्वी रस्त्यांवरील कचरा बाजूला करतो. नालेसफाई करतो. नद्यांतल्या गाळ काढतो. मुंबई महापालिकेची ही पद्धत आहे. त्यानंतर जे दिसतं ते चांगलंच दिसतं. त्यामुळे बरं झालं घाण गेली. पावसाळय़ाआधीची नालेसफाई झाली, असे तडाखे आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना लगावले.
काहीतरी होणार याची कुणकुण आम्हाला आधीपासूनच होती आणि तुमचं इथलं कॅरेक्टर (बंडखोर महेंद्र थोरवे) आम्हाला पहिल्यापासून माहित आहे. हे कॅरेक्टर अलीकडं बरंच कॉर्पोरेट झालं. पण माझ्या आजोबांचं, शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजीचं आवडतं असलेलं आमचं दुसरं घर असलेलं कर्जत कुणाच्या बाजूने आहे, हे ऐकण्यासाठीच मी इथे आलो आहे. सांगा… कर्जत कुणाचं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी करताच फक्त आणि फक्त शिवसेनेचं.. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा घुमल्या.
रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, सहसंपर्कप्रमुख विजय पाटील, जिल्हा सल्लागार भरत भगत, विधानसभा संघटक संतोष भोईर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली. व्यासपीठावर माजी खासदार संजय पाटील, युवासेना रायगड जिल्हा युवा अधिकारी मयूर जोशी, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, माथेरानच्या माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
प्रसाद घाबरू नकोस.. शिवसेना पाठीशी आहे!
पनवेल: आदित्य ठाकरे यांनी आज कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन शिवसेना माथेरान शहर संपर्कप्रमुख प्रसाद साकंत यांची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. प्रसाद घाबरू नकोस… शिवसेना भक्कमपणे तुझ्या पाठीशी आहे, असा विश्वास दिला. बंडखोरांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यात सावंत जखमी झाले होते.
































































