
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या शोले या कल्ट क्लासिक चित्रपटाची जादू 12 डिसेंबरला पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे, शोले त्याच्या मूळ क्लायमॅक्समध्ये परततो आहे. या चित्रपटाचा मूळ शेवट ठाकूर गब्बरला मारून टाकतो असा होता. जो अत्यंत हिंसक वाटल्याने त्या काळी बदलण्यात आला होता आणि गब्बरला पोलीस बेडय़ा घालून घेऊन जातात असे दाखवण्यात आले होते. त्यामुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
सलिम-जावेद लिखित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले या चित्रपटाला याच वर्षी 15 ऑगस्टला 50 वर्षे पूर्ण झाली. चित्रपटांचा सुवर्णकाळ ज्या चित्रपटापासून सुरू झाला तो शोले चित्रपट आता सुवर्ण महोत्सवी वर्षात आहे. यानिमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातली जय-वीरू, ठाकूर, गब्बर, बसंती, कालिया, सांबा, सुरमा भोपाली अशी सगळी पात्रे आजही चित्रपटप्रेमींच्या हृदयात घर करून आहेत. 12 डिसेंबरला हा चित्रपट नव्याने प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा नवा ट्रेलरही चर्चेत आला आहे.




























































