
नगर जिह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा अनेक क्षेत्रांत डंका वाजला आहे. नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नासासारख्या उपक्रमांनी महाराष्ट्र गाजवला आहे. एकीकडे ही स्थिती असताना शाळांमध्ये पटसंख्या वाढत असताना, शाळांतील वर्गखोल्यांना अवकळा आली आहे. जिह्यात तब्बल 704 वर्गखोल्यांची अजूनही कमतरता आहे.
नगर जिल्हा परिषदेच्या शाळांनी गुणवत्ता राखली आहे. त्यामुळे दरवर्षी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी मराठीकडे वळत आहेत. परिणामी जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या वाढत आहे. एकीकडे पटसंख्या वाढत असताना, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी वर्गखोल्या अपुऱया पडत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही दुरवस्था कायम आहे. मध्यंतरी शिर्डी येथील साईबाबा संस्थानने जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी निधी दिला होता. मात्र, या निधीचा अद्यापि उपयोग करण्यात आलेला नाही. त्यातील केवळ दहा कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. त्यातून 83 वर्गखोल्या यावर्षी बांधून झाल्या आहेत. उर्वरित 10 कोटी रुपये पडून आहेत.
जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला निधी दिला जातो. तो निधी तोकडा असल्याने वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण होत नाही. निधी आणि वर्गखोल्यांची मागणी यांचा ताळमेळ बसत नाही. त्यातून दरवर्षी वर्गखोल्यांची संख्या वाढत गेली आहे. त्यातच दरवर्षी धोकादायक झालेल्या वर्गखोल्या पाडाव्या लागतात. तोही आकडा वाढतो आहे.
निंबोडी शाळेतील खोल्या पडल्याने विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून धोकादायक बनलेल्या शाळांबाबत अहवाल मागविला जातो. आज बांधलेली वर्गखोली लगेच मोडकळीस येते, ही वस्तुस्थिती आहे.
वस्तुस्थिती
एकूण शाळा – 3545
विद्यार्थी – 209476
वर्गखोल्या – 12166
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रयत्नांतून यंदा 50 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून सुमारे साडेतीनशे वर्गखोल्या बांधून होतील. साई संस्थानचा 10 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्याचाही वापर करून वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले.



























































