शीव रुग्णालयात डॉक्टर, परिचारिकांची कमतरता; शिवसेनेने घेतला आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, लोकमान्य टिळक रुग्णालयाचा (शीव) वैद्यकीय सुविधांचा आढावा घेऊन अधिष्ठातांची भेट घेण्यात आली. रुग्णालयात डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय यांची कमतरता आहे. बालरुग्णांसाठी अतिदक्षता विभागाची कमतरता, औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरून आणण्यास सांगितली जातात. वॉर्डमध्ये कायम अस्वच्छता असते. गरोदर महिलांवर वेळीच उपचार होत नसल्याने खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. यावर तातडीने उपाययोजना करा, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी विभागप्रमुख महेश सावंत, माजी नगरसेवक टी. एम. जगदीश, आशीष मोरे, माजी नगरसेविका हर्षला मोरे, उर्मिला पांचाळ, उपविभागप्रमुख धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, उपविभागप्रमुख प्रकाश आचरेकर, उपशाखाप्रमुख जावेद इनामदार उपस्थित होते. दरम्यान, नवीन इमारतीचे काम सुरू असून पूर्ण बांधकाम होण्यास दोन वर्षे लागतील. तरीही अधिकाऱयांची बैठक घेऊन लवकरच सुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिले.