डोंबिवलीत खमंग थेपले, पराठय़ांचा घमघमाट, घरच्या मास्टर शेफला मिळाले व्यासपीठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, डोंबिवली

सुकामेवा, पनीर स्टफ, नवरत्न, पौष्टिक फ्युजन, मेथी मल्टीग्रेन थेपले अन् पराठे …. त्यावर खमंग तुपाची धार… डोंबिवलीत आज थेपले, पराठय़ांचा घमघमाट दरवळला. निमित्त होते मिती क्रिएशन्स निर्मित चैत्रगौर महिला मंडळ, दैनिक ‘सामना’ माध्यम प्रायोजक यांच्या सहकार्याने उत्तरा मोने यांनी आयोजित केलेल्या ‘श्रावण महोत्सव 2019’चे. या महोत्सवांतर्गत ‘उत्सव पाककलेचा…उत्सव खाद्यसंस्कृतीचा’ या स्पर्धेत घरातील मास्टर शेफ असलेल्या शेकडो गृहिणींनी सहभाग घेत आपली पाककला सादर केली. त्यातून पाच महिलांची निवड करण्यात आली आहे.

आगरकर रस्त्यावरील आदित्य सभागृहात ‘उत्सव पाककलेचा…उत्सव खाद्यसंस्कृतीचा’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन फेऱ्यांमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीसाठी पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली. या स्पर्धेचे मुख्य परीक्षक म्हणून उत्तरा मोने, शेफ तुषार प्रिती देशमुख, न्युटीशनिस्ट नमिता नानल यांनी तर शिवानी नेमावकर, डॉ. सिंधूर कला जोशी, श्रीया जोशी स्वाती जोशी, डॉ. स्मिता तांबरे, डॉ. सुनील जयस्वाल, शुभांगी देवचके, विजय कामेरकर, पराग बापट यांनी काम पाहिले, तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कविता गावंड, अनिता मयेकर, शिल्पा मोरे, शीतल धुरी, प्रतिभा पांचाळ, सुचिता पाटील, प्राजक्ता देशपांडे, विजया शिरोळकर, मानसी गावडे, नीशा रेड्डी या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. तसेच प्रायोजक म्हणून म्हाळसा स्पा सलून, तन्वी हर्बल्स, एनकेजीएसबी बँक, विको, शारी ऍकॅडमी, केसरी टुर्स, वॉयला फॅशन ज्वेलरी, पीएनजी असून माध्यम प्रायोजिक दैनिक ‘सामना’ आहे.

आठ वर्षांच्या चिमुरडीचा उत्साह

स्पर्धेमध्ये एक आठ वर्षांच्या चिमुरडीचाही उत्साह पाहण्यास मिळाला. अन्वी पिंगळे असे या चिमुकलीचे नाव असून सर्व परीक्षकांसह उपस्थितांचे तिने लक्ष वेधले.

प्राथमिक फेरीचे विजेते

शीतल कडके, शिल्पा महाजन, ऐश्वर्या पुणेकर, प्रसन्ना पानवडीकर, मधुरा खेडेकर; तर उत्तेजनार्थ म्हणून कांचन रानडे, दीपाली मारू, विजया महाडिक यांची निवड करण्यात आली.

गृहिणींच्या कलागुणांना वाव

नोकरदार महिलांचे नेहमीच कौतुक होते, पण गृहिणी बनणे सोपे काम नसून त्यांच्यातही अनेक कलागुण असतात. या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून चार वर्षे श्रावण महोत्सव आयोजित केला जातो. त्याला दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे स्पर्धेच्या आयोजिका उत्तरा मोने यांनी सांगितले.