कुर्ला येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज तलाव कात टाकणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कुर्ल्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज तलावात लवकरच बोटिंग, कारंजे, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांसह अत्याधुनिक सुविधा सुरू होणार आहेत. याबाबत आज झालेल्या सुधार समितीच्या संयुक्त बैठकीत प्रशासनाने सर्व सोयीसुविधा लवकरच देणार असल्याचे आश्वासन दिले. याबाबत कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

कुर्ला पश्चिम येथील लालबहादूर शास्त्री मार्गावर हा तलाव आहे, मात्र सद्यस्थितीत या तलावाची दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुधार समिती अध्यक्ष दिलीप (मामा) लांडे यांनी संयुक्त बैठकीत ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. गेल्या आठ वर्षांपासून तलावाची सुधारणा झालेली नाही. त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक झरे बंद झाले आहेत. तलावात मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. येथील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. अनेक जण या तलावात आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी तलावाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावा अशा सूचनाही त्यांनी केली. सभोवतालच्या झोपडपट्टय़ांतून येणारे सांडपाणी रोखावे, मलनिस्सारणवाहिनी आणि पर्जन्यजलवाहिनी एकत्र टाकण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी उपआयुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांच्यासह पालिका अधिकारी, कुर्ल्यातील शिवसेना शाखाप्रमुख, महिला शाखा संघटक उपस्थित होते.

प्रेक्षणीय स्थळ होणार
या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी कायमस्वरूपी क्रेनची व्यवस्था करावी, नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था करावी, सुंदर उद्यान तयार करावे अशा सूचनाही दिलीप लांडे यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी उपआयुक्त क्षीरसागर यांनी सर्व सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना संबंधित खात्याच्या अधिकाऱयांना दिल्या. या तलावात सुधारणा आणि सुशोभीकरण झाल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज तलाव पूर्व उपनगरातील प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपाला येईल असे लांडे यांनी सांगितले.