वीरभद्र बिरोबा जागृत देवस्थान मंदिरातील दानपेटी फोडुन 50 हजाराची लूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री वीरभद्र बिरोबा जागृत देवस्थान मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यासह 50 हजार रुपयाची लूट केल्याची घटना तालुक्यातील सोनेवाडी येथे शनिवारी (23) रोजी उघडकीस आली. आतील रोकड व ऐवज लंपास करणाऱ्या चोरांनी नामीयुक्ती लढवत कुलूप जैसे थे लावून दिल्यामुळे चोरी झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षातच आले नाही.

बिरोबा यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे दरवर्षी भाविकांच्या मोठ्या उपस्थित भरला जातो. पंचक्रोशीतील भाविकही या यात्रेला गर्दी करतात. ही दानपेटी पूर्ण भरल्यावरच उघडू असा ग्रामस्थांचा निर्णय झाला होता त्यामुळे तीन वर्षापासून ही दानपेटी उघडलेली नव्हती. याचाच मोका साधून चोरट्यांनी दानपेटी मधील सर्व रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने काढल्यानंतर या चोरट्यांनी नवीन कुलूप पुन्हा जैसे तैसे दानपेटीला लावून दिल्यामुळे ही पेटी फोडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले नव्हते.

विरभद्र बिरोबा महाराजांचा यात्रा उत्सव संपल्यानंतर हिशोबाच्या दिवशी बिरोबा यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दानपेटी उघडण्याचा निर्णय झाला होता. ग्रामस्थ पेटी उघडण्याच्या तयारीत असताना त्यांना पेटीचे कुलूप दुसरे असल्याचे लक्षात आले. त्यांनी ते कुलूप उघडले असता आत मध्ये त्यांना काहीच मिळून न आल्यामुळे पेटीतील गेल्या तीन वर्षापासूनचा असलेला सर्व ऐवज चोरट्यांनी चोरी केले असल्याचे लक्षात आले.

अखेर हिशोबाच्या दिवशी ही बाब लक्षात आली. दरवर्षी बिरोबा यात्रा उत्सवाच्या निमित्ताने नवस बोललेले भाविक दोन गुंजा, दोन ग्रॅम सोने व चांदीचे दागिने या दानपेटीत टाकत असल्याचे बिरोबा यात्रा उत्सव मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. बिरोबा मंदिरात दानपेटी फोडण्याची ही पहिलीच घटना झाली असून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे अशी मागणी उपसरपंच संजय गुडघे, निरंजन गुडघे, तंटामुक्त मुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे, पोलीस पाटील दगू गुडघे, संतोष गुडघे,भिमराज गुडघे, मारुती आव्हाड, संजय गुडघे, सचिन गुडघे, नवनाथ गुडघे, गणेश साबळे, आण्णासाहेब कांदळकर , संतोष गुडघे, सुनील शिंदे यांच्यासह यात्रा कमिटी व सोनेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.