
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
प्रत्येक क्रिकेटपटूला आपला खेळ आणि आत्मविश्वास यांची सांगड घालण्यासाठी संघातील आपल्या जागेची सुरक्षा हवी असते. सतत संघातून आत-बाहेर होण्यामुळे खेळाडूचा स्वतःवरचा विश्वासच संपतो आणि त्याच्या कारकीर्दीवर त्याचा विपरीत परिणाम होतो, अशी खंत मुंबईचा धडाकेबाज फलंदाज आणि यंदा दिल्ली कॅपिटल्स संघाला प्रथमच आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यर याने व्यक्त केली आहे.
टीम इंडियाच्या यंदाच्या वेस्ट इंडीज दौऱयात वन डे संघात स्थान मिळालेल्या 24 वर्षीय श्रेयस अय्यरने युवा खेळाडूंच्या मनातील खंत प्रसिद्धीमाध्यमांसमोर बोलून दाखवली. तो म्हणाला, तुम्ही एक प्रतिभावंत क्रिकेटर आहात, पण तुम्हाला तुमचा खेळ दाखवण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळाली नाही तर तुमचा आत्मविश्वास कसा कायम राहील? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तर संघातून सतत आत-बाहेर होण्यासारखे दुसरे दुःख नाही जे मी अनुभवले आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्ध मिळालेल्या संधीचा योग्य लाभ उठवण्यासाठी मी परिश्रम घेतोय. म्हणूनच खेळाडूला त्याच्यातले टॅलेंट दाखवण्यासाठी योग्य ती संधी मिळायला हवी असे माझे आग्रही मत आहे.
देशासाठी वर्ल्ड कप खेळायचे माझे स्वप्न
यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळायला मिळणार अशी अपेक्षा होती, पण संघात स्थान न मिळाल्याने माझी निराशाच झाली. अर्थात भविष्यात देशासाठी विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न आजही उराशी बाळगले आहे. मला अशी संधी मिळाली तर नक्कीच त्याचे सोने करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, असा विश्वास 24 वर्षीय श्रेयसने बोलून दाखवला. श्रेयस टीम इंडियाकडून 6 एकदिवसीय आणि 6 टी-20 लढती खेळाला आहे. संघातील समावेशात सातत्य नसल्याने श्रेयस नाराज आहे.



























































