
सामना प्रतिनिधी । नांदेड
“उत्तम जागा पाहूनी मल्हारी देव नांदे गड जेरुरी” अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत, बेलभंडाऱ्याची उधळण करीत पारंपारीक पध्दतीने यंदाही माळेगावच्या श्रीखंडोबा रायाच्या यात्रेस शुभारंभ झाला आहे. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्या व मानकऱ्यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रारंभी सकाळी शासकीय पुजा करण्यात आली. त्यानंतर दुपारी पालखी पुजनानंतर देव स्वारी काढण्यात आली.
यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, आ. प्रताप पाटील चिखलीकर, पुजारी पांडूरंग नारायणराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, उपाध्यक्ष समाधान जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, आमदार डी.पी.सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रेड्डी दत्तात्रय लक्ष्मणरेड्डी, महिला व बालकल्याण समिती सभापती मधुमती राजेश देशमुख, समाजकल्याण समिती सभापती शिलाताई दिनेश निखाते, माळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद राठोड यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मानकऱ्यांचा गौरव
पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारी नाईक (रिसनगाव), खुशाल भगवान भोसीकर (पानभोसी), व्यंकटराव मारोती पांडागळे (शिराढोण), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे मुकदम पानभोसी, नागेश गोविंदराव महाराज कुरुळा या मानकऱ्यांचा फेटा बांधून जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला.
खंडोबा यात्रेत वाघ्या-मुरळी
पारंपारीक पध्दतीने कवडयाच्या माळा, भाळी लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करत असते. या वाघ्या मुरळीला पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

































































