उत्तरकाशीतील धराली पुराचे धक्कादायक वास्तव समोर; ढगफुटी नव्हे तर ‘या’ वैज्ञानिक कारणामुळे आला होता महापूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात 5 ऑगस्ट 2025 रोजी आलेल्या विनाशकारी पुराचे गूढ आता उकलले आहे. सुरुवातीला ही घटना ढगफुटी किंवा हिमनदीचा तलाव फुटल्यामुळे घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, ‘नॅशनल हेजर्ड्स’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या संशोधनातून या महापुरामागे एक वेगळेच वैज्ञानिक कारण असल्याचे समोर आले आहे. श्रीकांता हिमनदीवरील बर्फाचा एक अवाढव्य तुकडा अचानक कोसळल्यामुळे ही आपत्ती ओढवल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

गिरीबाबू दंडबथुला, ओमकार शशिकांत घटगे, शुभम रॉय, अपूर्व कुमार बेरा आणि सुशील कुमार श्रीवास्तव या संशोधकांच्या पथकाने उपग्रह प्रतिमा, डिजिटल एलिव्हेशन मॉडेल्स आणि स्थानिक नागरिकांनी टिपलेल्या व्हिडिओंच्या साहाय्याने या संपूर्ण घटनेची पुर्नबांधणी केली आहे. या अभ्यासानुसार, श्रीकांता हिमनदीच्या वरच्या बाजूला सुमारे 5 हजार 200 मीटर उंचीवर 0.25 वर्ग किलोमीटर क्षेत्रावर पसरलेला बर्फाचा एक मोठा पॅच होता. या बर्फाची घनता प्रति घनमीटर 900 किलोग्रॅम गृहीत धरल्यास, या तुकड्याचे एकूण वजन 6.7 ते 6.9 दशलक्ष किलोग्रॅम इतके प्रचंड होते.

संशोधनात असे दिसून आले की, हा अजस्त्र बर्फाचा साठा हिमनदीच्या नेव्हिगेशन झोनमधून निखळला आणि सुमारे 1 हजार 700 मीटर खाली खीरगंगा दरीत कोसळला. वेगाने खाली येत असताना झालेल्या घर्षणामुळे बर्फाचे पाणी झाले आणि त्यात माती, खडक व गाळ मिसळला गेला. पाणी आणि ढिगाऱ्याच्या या शक्तिशाली प्रवाहाने अरुंद दरीतून वाहत येत धराली गावात प्रचंड हाहाकार माजवला. 15 वर्षांच्या उपग्रह प्रतिमांचा अभ्यास केला असता, जुलै 2025 मध्ये हा बर्फाचा तुकडा पहिल्यांदाच इतक्या मोठ्या आकारात दिसला होता, जो पुरानंतर पूर्णपणे गायब झाला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, त्या काळात परिसरात पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा होता, त्यामुळे ढगफुटीची शक्यता संशोधकांनी फेटाळून लावली आहे. तसेच वरच्या भागात कोणतेही हिमनदी तलाव अस्तित्वात नसल्याने तलाव फुटल्याचा दावाही चुकीचा ठरला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हिमालयातील बदलत्या हवामानामुळे हिमनद्या वितळत असून बर्फाचे असे अस्थिर तुकडे उघडे पडत आहेत. ही घटना हिमालयातील एका नवीन प्रकारच्या ‘क्रायो-जलविज्ञान’ धोक्याकडे लक्ष वेधणारी आहे. भविष्यातील अशा आपत्ती टाळण्यासाठी रडार उपग्रहांद्वारे हिमनद्यांवरील बर्फाच्या हालचालींचे नियमित निरीक्षण करणे आणि धोक्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे या अभ्यासात सुचवण्यात आले आहे.