संगमनेरात गंठणचोरांची टोळी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीरामपुरातील चौघा गंठणचोरांना संगमनेर आणि राजूर पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून 96 हजारांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. साहिल नसीर खान (वय 21, रा. वॉर्ड नं. 3), अर्जुन कानिफनाथ भोसले (वय 21), कमलेश उत्तम पवार (वय 21) व गुफरान निसार पठाण (वय 21, तिघेही रा. वॉर्ड क्र.2, श्रीरामपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राजूर येथील कुसूम प्रभाकर नाडेकर या शनिवारी (दि. 19) राजूर बसस्थानकात बसमध्ये चढत असताना चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील 16 ग्रॅम 960 मिली वजनाचे आणि सुमारे 96 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण ओरबाडून पोबारा केला होता. याप्रकरणी राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी बसस्थानकावरील सीसीटीव्हीचा आधार घेत संशयितांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता, चार संशयित संगमनेर आगाराच्या बसमधून पळून जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी पथकासह खासगी वाहनातून बसचा पाठलाग सुरू केला. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना याबाबतची माहिती दिली.

पोलीस उपअधीक्षक मदने यांनी संगमनेर वाहतूक शाखेचे सहायक फौजदार विजय परदेशी यांना नाकाबंदीच्या सूचना दिल्या. त्यानुसार अकोले नाका येथे नाकाबंदी केली. काही वेळातच राजूरहून सुटलेली ती बस अकोले नाक्यावर आली. पोलिसांनी बस थांबवून चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुह्याची कबुली दिली आहे.