बेलापूर खुर्दमध्ये नरभक्षक बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

श्रीरामपूर येथे गेल्या तीन महिन्यापासून परिसरात दबा धरून नागरिकांवर जीवघेणा हल्ला करणारा बिबट्या अखेर वन विभागाने जेरबंद केला. त्यामुळे बेलापूर खुर्द परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून परिसरात वास्तव्यास असलेल्या या बिबट्याने दहशत निर्माण केली होता. शेतकरी कुटुंबातील निरज प्रमोद पुजारी, आशिष पुजारी, शांताबाई जाधव, संजय लोखंडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले होते. तसेच अनेक शेळ्यांसह प्राण्यांचा फडशा पाडला होता. त्यामुळे या भागात बिबट्याची दहशत पसरली होती. वन विभागाला विनंती करून या भागात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली. शिरसगाव येथून पिंजरा आणण्यासाठी बालू पुजारी, धनंजय पुजारी, सूर्यकांत लांडे, गोररक्षनाथ सुराशे यांच्या सहकार्याने अजित देशमुख यांच्या गट नं 258 मधील शेतात पिंजरा लावण्यात आला होता.

रविवारी पहाटे बिबटया अलगत पिंजऱ्यात अडकला व त्याने डरकाळ्या फोडण्यास सुरवात केली. या आवाजाने परिसरातील लोकांनी पिंजऱ्या कडे धाव घेऊन बघितले असता त्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसताच सुटकेचा श्वास सोडला. यावेळी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. याकामी बेलापूर खुर्दचे उपसरपंच अॅड. दीपक बारहाते, माजी उपसरपंच प्रा. अशोक बडधे, द्वारकानाथ बडधे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जखमी लोखंडे घरी

दरम्यान तीन दिवसांपूर्वी याच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले संजय लोखंडे यांना नगरच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांना घरी सोडून देण्यात आले. त्यांची प्रकृती चांगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या