
अभिनेत्री श्रिया पिळगावकर नुकतीच ऑस्ट्रेलियातील आपल्या दहा दिवसांच्या सहलीवरून परतली आहे. तिथल्या आठवणी आणि चित्तथरारक अनुभवांमध्ये ती रमली आहे. न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या दोन राज्यांमध्ये तिने प्रवास केला.
स्ट्रीट आर्ट नजाऱयांचा अनुभव आणि विविध खाद्यसंस्कृतींचा मिलाफ साधणाऱया एशियन फ्युजन पाककृतींचा आस्वाद घेण्याबरोबरच एमसीजी इथे ‘हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान’ सामना पाहणे हा श्रियासाठी मेलबर्नमधील सर्वोत्तम अनुभव होता.
सिडनीमधील वास्तव्यात श्रियाला कोआला आणि कांगारू भेटले. श्रिया म्हणते, ‘मला कोआला खूप आवडतात. त्यांना प्रत्यक्ष बघणं हे माझं स्वप्न होतं! माझी आई कधी-कधी मला कोआला बेअर म्हणून हाक मारते.’ सिडनीपासून दीड तासावर असलेल्या वूलिंगगोंग या किनारपट्टीवरच्या शहरापर्यंत प्रवास केला आणि तिथे समुद्राच्या थेट वर 15 हजार फुटांवरून उडी मारली. हा तिच्यासाठी खूप रोमहर्षक क्षण होता. सिडनीपासून केवळ दोन तासांच्या अंतरावर असलेल्या या शहरामध्ये कियामा बंदरावरील दीपगृहाला तिने भेट दिली आणि समुद्राचे पाणी हवेत उडविणारे अनेक ब्लोहोल्सही पाहिले. श्रियाची ऑस्ट्रेलिया डायरी न संपणारी आहे. ऑस्ट्रेलियाला जाऊन तिथला इतिहास आणि संस्कृतीविषयी तिला अधिक जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी ही एक ट्रीप पुरेशी नाही, असे तिने सांगितले.

























































