गाय आणि माय यांचे पूजन जिथे होते ते राष्ट्र श्रेष्ठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

स्त्रीला पुराण काळापासून अत्यंत महत्त्वाचे आणि श्रेष्ठ असे स्थान आपल्या संस्कृतीत आहे. गाय आणि माय आपल्याला अत्यंत वंदनीय आहेत. ज्या राष्ट्रात या दोन्हींचे पूजन केले जाते, त्यांचा सन्मान केला जातो ते राष्ट्र प्रगती करते. आपले हे राष्ट्र म्हणूनच श्रेष्ठ असल्याची भावना वेदमूर्ती अमोलशास्त्री यांनी व्यक्त केली.

बीड शहरात गेल्या चौदा वर्षांपासून श्रुतीगंध वेदपाठशालेच्या माध्यमातून वेद अध्ययन त्याच बरोबर आपली संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम कठीण परिस्थितीत वेदमूर्ती अमोल शास्त्री आणि त्यांचे कुटुंबीय करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल समाजतील अनेकांनी घेत वेदपाठशाळेस आप-आपल्या परीने मदतीचा हात दिला आहे. बीड शहरात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात ब्रह्मतेज स्त्री संघाच्या महिलांचा सक्रिय सहभाग असतो. वेदपाठशाळेच्या संदर्भात या महिलांनी आपल्या माध्यमातून मदत व्हावी या सहकार्याच्या भावनेतून एकत्र येत शुक्रवारी वेदपाठ शाळेस भेट देऊन पिठाची गिरणी, वेद अध्ययन करणाऱ्या मुलांना येणाऱ्या थंडीच्या दिवसांत वापरासाठी टोप्या आणि साखर देण्यात आली. यावेळी पुढे बोलतांना अमोलशास्त्री यांनी हिंदुस्थानी संस्कृती आणि परंपरा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. शाळेत शिकविले जाणारे शिक्षण हे धन कमावण्यासाठी तर वेद पाठशाळेत घेतलेले शिक्षण हे संस्कृती, नीतिमूल्ये देणारे असते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे वेद अध्ययन सुरू असून अनेकांच्या योगदानाने हे कार्य सुरू आहे. चांगले काम करत रहा, दान करत रहा आपल्याला कधी कमी पडत नाही. जो व्यक्ती दान करत नाही तो सर्व असूनही दरिद्री असतो. स्त्री ही पूजनीय आहे. तिचा मान सन्मान हा झालाच पाहिजे असे ते म्हणाले.

सातत्याने ब्रह्मतेज स्त्री संघाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापूर्वी कोळवाडी येथील आरोग्यधाम व गोशाळेस भेट, वरदायिनी महालक्ष्मी मंदिरात सामुहिक श्रीसुक्त यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या पुढेही असेच सामाजिक उपक्रम ब्रह्मतेज स्त्री संघाच्या वतीने राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे नियोजन कविता देशमुख, रोहिणी बाभुळगावकर, सारिका गुळजकर यांनी केले. तर सूत्रसंचालन मीरा रत्नपारखी यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला सदस्य उपस्थित होत्या.