
सामना ऑनलाईन । नगर
नगर येथील संजयनगर झोपडपट्टीत राहणारी कुमारी शुभांगी राजू भंडारे इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक वंचित फुटबॉल स्पर्धेत हिंदुस्थानचे नेतृत्व करणार आहे. तिचे वडील वडापाव विकतात तर आई हॉटेलमध्ये चपात्या लाटते. सर्व प्रकारच्या असुविधा आणि गरिबीवर मात करीत शुभांगीने हे यश मिळवले.
आपण समाधानी नसून हिंदुस्थानच्या फुटबॉल संघात प्रवेश मिळविण्याचे आपले पुढील दोन वर्षातील ध्येय असल्याचे शुभांगीने सांगितले. मंगळवारी स्नेहालय परिवाराने आयोजिलेल्या सत्कार सोहळ्यात ती बोलत होती.
नगरमधील झोपडपट्टीतील बालकांसाठी मागील अठरा वर्षांपासून बालभवन हा उपक्रम स्नेहालय राबविते. बालकांच्या शैक्षणिक, मानसिक विकासासाठी आणि चारित्र्य निर्माणासाठी 2 हजार बालकांसोबत बालभवन कार्यरत आहे. स्नेहालयची ‘सत्यमेव जयते फुटबॉल अकादमी’ ही सर्व सेवावस्तीतील (झोपडपट्ट्या तील) बालकां साठी सुरू केलेली अभिनव क्रीडा प्रबोधिनी आहे . शुभांगीने आपल्या यशाचे श्रेय स्नेहालय संस्था आणि या क्रीडा प्रबोधिनीला दिले.
वयाच्या चौथ्या वर्षापासूनच शुभांगी संजयनगर बालभवन प्रकल्पाशी जोडली गेली. स्नेहालय बालभवनची ती विद्यार्थिनी आहे. तिच्या क्षमता हेरून बालभवनचे सहसंचालक हनिफ शेख, ‘सत्यमेव जयते फुटबॉल अकादमीचे’ प्रशिक्षक राहुल वैराळ आणि नीलेश वैरागर यांनी शुभांगीला प्रेरीत केले. ७ वर्षांच्या मेहनतीनंतर सध्या शुभांगी याच उपक्रमात प्रशिक्षक म्हणून रुजू झाली. जागतिक स्लम साँकर (फुटबॉल) स्पर्धेत हिंदुस्थानच्या संघात प्रवेश मिळविण्यासाठी शुभांगीने मागील तीन वर्षांपासून अफाट मेहनत घेतली.




























































