नाथसागरातील दुर्मिळ मासा जाळ्यात; 15 किलो वजनाचा सिल्व्हर कॉर्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> बद्रिनाथ खंडागळे

नाथसागर जलाशयात मत्स्यव्यवसायिक रवि पल्हारे यांच्या जाळ्यात ‘सिल्व्हर कार्प’ प्रजातीचा मासा मिळून आला. पूर्ण वाढ झालेल्या या दुर्मिळ माशाचे वजन तब्बल १५ किलो एवढे आहे. विशेष म्हणजे या प्रजातीचा रंग गडद चंदेरी असतो. मात्र, आढळून आलेल्या या माशाचा रंग लालसर गुलाबी आहे. याची कारण मीमांसा करताना मत्स्य-अभ्यासक दिलीप भगत यांनी सांगितले की, ‘अत्यंत दर्जेदार मानले जाणारे ‘अलगी’ नावाचे शेवाळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने असा तात्पुरत्या स्वरूपाचा रंगबदल होत असतो.’

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा आवाका ४५० चौरस किलोमीटर एवढा आहे. अनेक महाकाय मगरींसह दुर्मिळातील दुर्मिळ जलजिवांचा वावर या पाणपसाऱ्यात आहे. तथापि, गेल्या काही वर्षांपासून नाथसागर जलाशयात विदेशी, हायब्रीड व दर्जाहीन मासळींचा सुळसुळाट झाला आहे. अत्यंत वेगवान प्रजोत्पादन व गावरान माशांची अंडीच खाऊन टाकण्याची जीवन शैली असल्याने अनेक दुर्मिळ मत्स्यप्रजाती दिसेनाशा झालेल्या आहेत. अशा विपरीत परिस्थितीत ‘सिल्व्हर कार्प’ माशांचे अस्तित्व समोर आले आहे. त्यामुळे नाथसागरच्या जैववैविध्यासह मत्स्यसंपदेवरही शिक्कामोर्तब झाले आहे.

१ वर्षानंतर ‘सिल्व्हर’ जाळ्यात…

मासेमार सखाराम सुखदेव यांच्या जाळ्यात हा दुर्मिळ मासा मत्स्यव्यवसायिक रवि पल्हारे यांना मिळाला आहे. पैठणच्या स्थानिक बाजारात त्याला मोठी मागणी निर्माण झाली आहे. गोड्या पाण्यात आढळणाऱ्या या मासळीत काटे कमी असतात. मऊशार व चविष्ट मांसामुळे खाद्यप्रेमींमध्ये या माशाला विशेष पसंती असते. मच्छीमार समाजाचे अध्यक्ष तथा नगरसेवक बजरंग लिंबोरे यांनी सांगितले की, ‘जायकवाडी धरणात यापूर्वी हा मासा मोठ्या प्रमाणात मिळत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण घटले आहे. १ वर्षानंतर सिल्व्हर मासा जाळ्यात सापडला आहे. बाजारात या माशाला प्रतिकिलो सुमारे ४०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला आहे.’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाथसागरात मत्स्यबीज सोडा

या पार्श्वभूमीवर नाथसागर जलाशयात मत्स्यबीज सोडण्याची मागणी पुढे आली आहे. गोदावरी मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन रमेश लिंबोरे यांनी सांगितले की, ‘पूर्वी शासनस्तरावर तसेच सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मत्स्यबीज सोडले जात होते. लाखोंच्या संख्येने सोडलेल्या मत्स्यबीजांपैकी काही हजार बीज फलित होतात. परंतु गेल्या १० ते १२ वर्षांपासून जायकवाडी धरणात मच्छीबीजच सोडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे धरणातील माशांची संख्या रोडावली आहे. काही मत्स्यप्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गावरान चिंगळ्या, कुर्दू, सुपरनेस व खवली प्रजातींच्या मासळींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यासाठी नव्याने मच्छीबीज सोडावे. यासाठी प्रयत्न व्हायला हवेत,’ अशी मागणी चेअरमन रमेश लिंबोरे यांनी केली.