सिंधुदुर्गचा सुपुत्र बनला मुंबईचा स्वच्छतादूत, पाचशेहून अधिक भिंतींवर लिहिला स्वच्छतेचा संदेश

मुंबईतील काही वस्त्यांमध्ये अस्वच्छ भिंती आपण पाहतो. अशा भिंतींवर स्वच्छतेचा नारा देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सिंधुदुर्ग जिह्यातील पाटगावचा सुपुत्र रोहित येरम हा युवक करत आहे. स्वच्छता संदेश देणाऱया जवळजवळ पाचशे वॉल त्याने रंगविलेल्या आहेत.

पाट हायस्कूलचा विद्यार्थी रोहित येरम हा कै. एकनाथ ठाकूर कला अकादमीच्या उपक्रमातून कलाशिक्षक संदीप साळसकर यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेला आहे. विद्यार्थीदशेत चित्रकलेत त्याने राज्यस्तरीय प्रथम पारितोषिके पटकावली आहेत. कलेची विशेष आवड असल्यामुळे मुंबईतील रहेजा स्कूल ऑफ आर्ट, वरळी येथे शिक्षण घेऊन आज कलाक्षेत्रात विविध पेंटिंगची निर्मिती करत आहे. रोहित याने काॉलेजमध्ये असतानाच आपला कॉलेजचा खर्च अशा कामांमधून जमविलेला आहे.

चित्रकलेच्या माध्यमातून ज्या विविध संधी आज उपलब्ध होत आहेत त्यापैकी वॉल पेंटिंग हीसुद्धा एक सुवर्णसंधी आहे. आज वॉल पेंटिंग करणे लोक पसंत करतात. पूर्वीच्या काळी एखाद्या कॅनवास पेंटिंग आपल्या घरात शोभा देण्यासाठी लावले जात होते, पण काळाच्या ओघात ही पद्धत मागे पडत चाललीय. – रोहित येरम, चित्रकार

प्राणी, पक्षी, पाने, फुले, मानवाच्या मनमोहक कलाकृती

शिक्षण घेता घेता वॉल पेंटिंग हा अर्थार्जनाचा भाग म्हणून आणि आपली आवड म्हणून करू लागला. आज स्वच्छता संदेश देणाऱया जवळजवळ पाचशे वॉल त्यांने रंगविलेल्या आहेत. मुंबईच्या विविध भागातील जवळजवळ 30 ते 40 फूट रुंदीच्या भिंती कल्पकतेने रंगून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्राणी, पक्षी, पाने, फुले, मानवाकृती अशा रचनांमधून या भिंती सुशोभित करण्यावर त्याचा भर असतो आणि सर्वांसाठी स्वच्छतेचा संदेशही असतो.

– रोहितने आपल्यासोबत कॉलेजमध्ये समीर सय्यद, अनिशा सरजीनी, प्राची बोटाले, हर्षद सोनवणे, यश हांडे, नमिता पावसकर आदी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन नवी मुंबई, वाशी, नेरूळ, बेलापूर, जुईनगर अशा मुंबईतील विविध भागातील भिंती रंगविल्या आहेत. यासाठी अॅव्रेलिक आणि रॉयल रंगांचा वापर केला आहे. याशिवाय मुंबईतील थिएटर, षण्मुखानंद हॉल अशा ठिकाणीही वॉल पेंटिंग केलेली आहेत. कलेच्या क्षेत्रात आवड असणाऱया मुलांकरिता ऑनिमेशन, कार्टून आर्ट, फोटोग्राफी पेंटिंग अशी विविध क्षेत्रे उपलब्ध आहेत आणि हा त्याचा मनोदय आहे.

आपली प्रतिक्रिया द्या