
सामना प्रतिनिधी । पुणे
पगार मागितला तो न देता कामावरून काढून टाकल्याची नोटीस दिल्याने रागाच्या भरात एका प्राध्यापकाने त्याच्या सर्व पदव्या आणि प्रमाणपत्रे जाळून टाकली. त्याचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल झाल्याची खळबळजनक घटना घडली. सूरज बाळासाहेब माळी असे या प्राध्यापकाचे नाव असून तो वारजे येथील सिंहगड आर. एम. डी. स्कूल ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे.
प्रा. सूरज माळी यांचा पगार थकला होता. त्याची मागणी केली असता महाविद्यालय प्रशासनाने त्यांचा पगार देण्यास नकार दिला. पाठोपाठ कामावरूनही काढून टाकण्याची नोटीस दिली. या संतापाच्या भरात प्रा. माळी यांनी घरातच गॅस पेटवून त्यावर एक एक पदवी प्रमाणपत्रे धरत ती जाळून टाकली. माळी हे एम. ई. पदवीधारक आहेत. वेतन मिळत नसल्याने त्यांचा शिक्षकी पेशावरील विश्वासच उडाला आहे. सिंहगडमधील शिक्षकांना बँकदेखील कर्ज देत नाही, असे सांगत त्यांनी पदवी प्रमाणपत्रे जाळली. त्याचा व्हिडीओ त्यांनी तयार केला.
सिंहगडमधील प्राध्यापकांची दयनीय अवस्था आहे. पगाराविना काम करावे लागते. पगाराचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. तो कधी सुटेल हे पांडुरंगालाच माहित, असे त्यांनी पदवी प्रमाणपत्रे जाळताना व्हिडीओपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. सिंहगड इन्स्टिटय़ूटमध्ये वेतन थकल्याने प्राध्यापकांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले होते आणि उच्च न्यायालयात धाव घेतली होती.




























































