
शीव रुग्णालयाचा पुनर्विकास प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झाला होता, मात्र पालिका प्रशासनाने आयत्या वेळी निविदा जास्त किमतीची असल्याचे कारण पुढे करून हा प्रस्ताव नाकारला. पुन्हा नव्याने निविदा काढण्यासाठी आणि पुन्हा स्थायी समितीसमोर यायला पाच महिने लागणार आहेत. प्रशासनाच्या या आडमुठेपणामुळे शीव रुग्णालयाचा पुनर्विकास रखडणार आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
स्थायी समितीने शीव रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी स्थायी समितीने मंजूर केला होता, मात्र तत्कालीन अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा कंत्राटमूल्य वाढवण्यास नकार दिला. त्यानंतर प्रशासनाने कंत्राटदाराशी वाटाघाटी करून कंत्राट किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, आरोग्य संचालक व नगर अभियंता यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करून त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने 14 वरून 10 टक्क्यात काम करण्याची तयारी दर्शवली. त्यावर प्रशासनाने आणखी कंत्राटमूल्य कमी करण्याची विनंती केली. कंत्राटदाराने आणखी दोन टक्के म्हणजे 8.90 टक्क्यांपेक्षा मूल्य कमी करण्यास नकार दिल्याने प्रशासनाने अखेर निविदा रद्द केली.
असा आहे पुनर्विकास
शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या 1900 खाटांच्या प्रस्तावित पुनर्विकासात वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या मागील बाजूस तळ अधिक 20 मजल्यांची परिचारिका महाविद्यालय व निवासी अधिकाऱयांसाठी निवासस्थान इमारत, रुग्णालयाच्या अखत्यारित बराक प्लॉटवर तळ अधिक 19 मजल्यांची पालिकेच्या उपयोगाकरिता व कर्मचारी निवास्थानाची इमारत बांधली जाणार आहे. तसेच याच ठिकाणी तळ अधिक 25 मजल्यांची पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह इमारत, याशिवाय तळ अधिक तीन मजल्यांची तात्पुरता निवारा इमारत उभारली जाणार आहे. या बांधकामांसाठी नवी दिल्लीतील अर्कोप व शशांक मेहेंदळे ऍण्ड असोसिएटस्ने बनवलेल्या आराखडय़ानुसार निविदा मागवल्या होत्या. त्यात 14 टक्के अधिक बोली लावणारी अहलुवालिया कॉण्टॅक्ट इंडिया लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली होती.
पालिका प्रशासनाने शीव रुग्णालयाची निविदा रद्द का केली आणि निविदा पुन्हा का काढत आहात याचा खुलासा केला पाहिजे. त्याबाबतचा रीतसर प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर आणावा- यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती


























































