बापरे… बसून टिव्ही पाहिल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

सुट्टीच्या दिवशी, फावल्या वेळात सोफ्यावर आरामात बसून टीव्ही बघणे हा अनेकांचा छंद आहे असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. मात्र असे आरामशीर बसून टीव्ही बघणे तुमच्या जीवावर बेतू शकते. नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनानुसार बसून टिव्ही पाहिल्याने हृदयविराचा झटका येण्याची शक्यता असते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमेरीकेतील कोलंबीया विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून हे समोर आले आहे. या संशोधनासाठी संशोधकांनी 3,592 लोकांचे तब्बल आठ वर्ष निरीक्षण केले व त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच अमेरिकेच्या हार्ट असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या मासिकात या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. या अहवालानुसार, ‘कामाच्या ठिकाणी आपण कितीही वेळ बसून काम केले तरी त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत नाही परंतू घरी आरामात बसून टिव्ही पाहिल्याने हृदयविकाराचा झटका येऊन तुमचा मृत्यू होऊ शकतो. चार तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ सतत टीव्हीसमोर बसून राहणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण 50 टक्क्याहून जास्त आहे. मात्र नियमित व्यायामामुळे हा धोका कमी होऊ शकतो असे देखील त्यात नमूद केलेले आहे. व्यायामामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक अशा गंभीर आजार होण्याची शक्यता कमी होते.