
सामना प्रतिनिधी । मुंबई
प्रभादेवीतल्या एका 14 मजली इमारतीच्या गच्चीवर स्टंटबाजी करणे ब्रिटनच्या स्टॉरर ग्रुपच्या अंगाशी आले. एका गच्चीवरून दुसऱ्या इमारतीच्या गच्चीवर उडी मारण्याची स्टंटबाजी करणाऱ्या त्या सहा ब्रिटिश तरुणांना मुंबई पोलिसांनी समज देऊन त्यांना बुधवारी मायदेशी पाठवून दिले.
प्रभादेवीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-ऑप. हौ. सोसायटीची 14 मजली इमारत आहे. सोमवारी दुपारी या इमारतीच्या गच्चीवर सहा तरुण स्टंटबाजी करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याविरोधात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दादर पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर दादर पोलिसांनी यू टय़ूबच्या मदतीने स्टंटबाजी करणाऱ्या ब्रिटनच्या सहा तरुणांना शोधून काढले. ते सर्व येत्या रविवारी ‘एनएससीएल’ येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत आले होते, ते स्टॉरर ग्रुपचे सदस्य आहेत. परदेशात गेल्यानंतर ते अशाप्रकारे स्टंटबाजी करतात.
मुंबईत आल्यानंतर त्यांनी गुगल मॅपवर कोणते ठिकाण स्टंटबाजीसाठी योग्य आहे याचा शोध घेतला तेव्हा त्यांना डॉ. आंबेडकर हौ. सोसा. आणि गॅरेज गल्लीतील रामशाम इमारत स्टंटबाजी करण्यासाठी योग्य वाटली. त्यानुसार त्यांनी आधी रामशाम इमारतीवर स्टंटबाजी केली. त्यानंतर ते आंबेडकर हौ. सोसा.च्या इमारतीवर गेले होते असे त्यांनी दादर पोलिसांच्या चौकशीत सांगितले. ते कुठल्याही देशात गेले की अशीच स्टंटबाजी करतात. पण हिंदुस्थानात असे करता येत नाही हे त्यांना ठावूक नव्हते. त्यामुळे पुन्हा असे कधी करू नका अशी समज देऊन त्यांना पुन्हा ब्रिटनला पाठवून दिल्याचे दादर पोलिसांनी सांगितले.






























































